Hajj Yatra 2022: विनापरवाना हजला गेलेल्या 300 जणांना अटक आणि 2 लाखांचा दंड; नियम मोडणाऱ्यांवर ही अशी सौदी अरेबियासारखी कारवाई झाली पाहिजे
सात जुलै पासून हज यात्रा सुरु होणार असून 12 जुलै पर्यंत असणार आहे. कोरोना महामारीनंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे ही यात्रा होणार आहे. या यात्रेला होणारी अनियंत्रित गर्दी टाळण्यासाठी सौदी अरेबियाने परवान्याशिवाय येणाऱ्यांना अटक करणार असल्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नियम मोडून यात्रेला आलेल्या तब्बल 300 हून अधिक लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रियाद : दोन वर्षांनंतर हज यात्रा (Hajj yatra 2022) होत आहे. 2020 आणि 2021 मध्ये सौदी अरेबियाने कोरोनामुळे परदेशी यात्रेकरूंना हज यात्रा (Hajj Yatra) करण्यास बंदी घातली होती. मात्र यावेळी सौदी सरकारने (Saudi Government) काही अटींसह परदेशी प्रवाशांना परवानगी दिली आहे. मात्र, विनापरवाना हजला गेलेल्या 300 जणांना अटक करण्यात आली आहे. तर यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हज यात्रा या आठवड्यात सुरू होणार आहे.
सात जुलै पासून हज यात्रा सुरु होणार असून 12 जुलै पर्यंत असणार आहे. कोरोना महामारीनंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे ही यात्रा होणार आहे. या यात्रेला होणारी अनियंत्रित गर्दी टाळण्यासाठी सौदी अरेबियाने परवान्याशिवाय येणाऱ्यांना अटक करणार असल्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नियम मोडून यात्रेला आलेल्या तब्बल 300 हून अधिक लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सौदी अरेबियाने विना परवाना यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरुंवर ही कारवाई सुरू केली आहे. परवान्याशिवाय हज यात्रेसाठी आलेल्या 300 मुस्लीमांना अटक करण्यात आली आहे. हज यात्रेचे सुरक्षा प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद अल बसामी यांनी परवान्याशिवाय आलेल्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.
जवळपास 300 जणांना अटक करण्यात आली आहे. अट केलेल्यांकडून 10 हजार सौदी रियाल म्हणजेच जवळपास 2 लाख 10 हजार रुपयांचा दंडही वसुल करण्यात आला आहे.
हज यात्रेच्या निमीत्ताने खबरदारी म्हणून मक्का शहराभोवतीची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. जवळपास 1 लाख लोकांना आणि 69 हजार वाहनांचा या परिसरातील प्रवेश नाकारण्यात आला आहे. यावर्षी फक्त 10 लाख लोकांना हज यात्रेची परवानगी देण्यात आली असून त्यातील 8 लाख 50 हजार हे परदेशी नागरिक आहेत.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष हज यात्रा झाली नव्हती. 2019 साली म्हणजेच कोरोना उद्रेकापूर्वी 25 लाख लोक हज यात्रेत सहभागी झाले होते. तर सन 2021 मध्ये हज यात्रेला लसीकरण पूर्ण झालेल्या फक्त 65 हजार नागरिकांनाच यात्रेची परवानगी देण्यात आली होती.
हज यात्रा इतकी महत्वाची का?
मुस्लिमांसाठी हज यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी हा एक स्तंभ आहे. इस्लाममध्ये 5 स्तंभ आहेत – कलमा वाचणे, नमाज वाचणे, उपवास म्हणजेच रोजा करणे, जकात म्हणजे दान देणे आणि हजला जाणे. प्रत्येक मुस्लिमाने कलमा, नमाज आणि रोजा ठेवणे आवश्यक आहे. पण जकात (दान) आणि हजमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. जे सक्षम आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्यासाठी हे दोन्ही (जकात आणि हज) आवश्यक आहेत.
हज यात्रेला कोण जाऊ शकते?
65 वर्षांपेक्षा कमी वयाचे मुस्लिमच हज यात्रेला जाऊ शकतात. म्हणजेच जर तुमचा जन्म 10 जुलै 1957 नंतर झाला असेल तर तुम्ही हज यात्रेला जाऊ शकता. हे नियम कोरोनाच्या दृष्टीने आहेत. हा नियम कोरोनानंतर सुरु करण्यात आला आहे. हज यात्रेला जाण्यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. यासह, लसीकरण असूनही, सौदी अरेबियाला जाण्यापूर्वी 72 तास आधी नकारात्मक RTPCR रिपोर्ट आवश्यक आहे. ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला या पुरुष सोबतीशिवाय हज यात्रेला जाऊ शकतात. मात्र, त्यांच्यासोबत 4 महिला साथीदार असणे आवश्यक आहे.