पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड, दुसऱ्यांदा पदभार सांभाळणार
पाकिस्तानात झालेल्या निवडणूकांत तुरुंगात बंद असलेले इमरान खान यांनी समर्थन दिलेल्या अपक्षांना जादा मते मिळाल्याने आरोपप्रत्यारोप होत होते. परंतू पाकिस्तानात आतापर्यंत तेथील लष्करच नेत्याची निवड करीत आले आहे. पाक सैन्याला इमरान नकोसे असल्याने नवाझ शरीफ यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. नवाझ शरीफ गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात लंडनहून पाकिस्तानात परतले होते.
कराची | 3 मार्च 2024 : पाकिस्तानात निवडणूकांचे निकाल जाहीर होऊनही अनेक दिवस सुरु असलेल्या राजकीय गोंधळानंतर अखेर नव्या पंतप्रधानांची घोषणा करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. नॅशनल असेंबलीचे अध्यक्ष सरदार अयाझ सादिक यांनी यासंदर्भात घोषणा केली. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांना 201 व्होट मिळविल्यानंतर पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून निवडले आहे. पाकिस्तानची जनता या निकालाची बराच वेळ वाट पाहात होती. नवाझ शरीफ यांनी स्वत: पंतप्रधान न होता आपल्या बंधूंना सत्तेचे सोपान सोपविल्याने आता पाकिस्तानचा राजकीय अस्थिरता संपुष्ठात येईल असे म्हटले जात आहे.
8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणूकांत नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनला पुरेसे बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना स्वत: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे बंधू आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाज यांना त्यांनी पंतप्रधान बनविण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला होता. अखेर इतर पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला. शहबाज यांना 201 तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमर अयुब खान यांना 90 मते मिळाली.
अशी झाली निवड
पीएमएल-एन आणि पाकिस्ताना पिपुल्स ( पीपीपी ) पार्टीचे संयुक्त उमेदवार शहाबाज यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. पाकिस्तानी तहरीक-ए-इंसाफ ( पीटीआय ) पार्टीचे उमर अयुब त्यांच्या विरोधात उभे होते. नवाझ शरीफ यांच्या पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इमरान खानच्या पीटीआयद्वारा समर्थन दिलेल्या 90 हून अधिक अपक्ष उमेदवारांनी 336 सदस्यीय नॅशनल असेंबलीत सर्वाधिक सीट जिंकल्या होत्या. परंतू निवडणूकीनंतर झालेल्या युतीमध्ये मुत्ताहीदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान ( एमक्यूएम-पी), इस्तेकाम-ए-पाकिस्तान पार्टी आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी ( पीपीपी ) आदींनी पीएमएल-एन उम्मीदवाराला पाठींबा दिला. त्यामुळ शहबाझ शरीफ सहज निवडून येतील असे म्हटले जात होते. उद्या शहबाज शरीफ यांना राष्ट्रपती निवास ऐवान-ए-सद्र येथे शपथ दिली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.