नोकरांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च, भारतीय वंशाच्या अब्जाधीश कुटुंबातील 4 जणांना तुरुंगवास
भारतीय वंशाचे उद्योगपती आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना न्यायालयाने साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. घरातील नोकरांशी गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे आरोप अतिशय गंभीर मानत न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली.
ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाविरोधात स्विस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना न्यायालयाने साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. घरातील नोकरांशी गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे आरोप अतिशय गंभीर मानत न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली. मात्र, त्यांच्यावरील नोकरांची तस्करी करण्याचा आरोप मात्र न्यायालयाने फेटाळला.
उद्योगपती प्रकाश हिंदुजा यांच्यासोबत त्यांची पत्नी कमल, मुलगा अजय आणि सून नम्रता यांच्यावर नोकरांची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. जिनिव्हा शहरात हिंदुजा कुटुंबाचे लेकसाइड व्हिला आहे. आपल्या व्हिलामध्ये त्यांनी एका भारतीय महिलेला कामावर ठेवले. तिला अत्यंत कमी पगार दिला. इतकंच नाही तर ती दुसरीकडे जाऊ नये यासाठी तिचा पासपोर्टही त्यांनी जप्त केला होता. सतत 18 तास तिच्याकडून हे कुटुंब काम करून घेत असे. त्या महिलेला त्यांनी फक्त 7 स्विस फ्रँक (सुमारे 6.19 पौंड) दिले.
हिंदुजा कुटुंबाच्या या अत्याचाराविरोधात त्या महिलेने पोलिसाकडे तक्रार दाखल केली. यामध्ये नोकरांच्या पगारापेक्षा हे कुटुंब त्यांच्या कुत्र्यांवर जास्त पैसे खर्च करते. त्यांच्या पाळीव कुत्र्यावर दरवर्षी 8,584 फ्रँक (7,616 पाउंड) खर्च करते असा दावा या महिलेने केला.
हे प्रकरण कोर्टात गेल्यावर कोर्टाने हिंदुजा यांना कर्मचाऱ्यांचे शोषण आणि ‘अनधिकृत’ रोजगार पुरवल्याबद्दल दोषी ठरवले. याव्यतिरिक्त कुटुंबावर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करणे, त्यांना स्विस फ्रँक्सऐवजी रूपयांमध्ये पैसे देणे, त्यांना व्हिला सोडण्यापासून रोखणे आणि त्यांना स्वित्झर्लंडमध्ये जास्त तास काम करण्यास भाग पाडणे या आरोपाखाली दोषी ठरवत साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
स्वित्झर्लंडमध्ये नोकरांचे शोषण, मानवी तस्करी आणि स्विस कामगार कायद्यांचे उल्लंघन हे मोठे गुन्हे मानले जातात. गेल्या आठवड्यातच हिंदुजा यांनी फिर्यादी पक्षाशी अज्ञात समझोता केला. मात्र, हा समझोता यशस्वी झाला नाही. त्यामुळे कोर्टाने आपला निर्णय देत फिर्यादी महिलेला न्याय दिला. याच प्रकरणात कोर्टाने उद्योगपती हिंदुजा यांच्या व्यवस्थापकालाही दोषी ठरवले आहे. कोर्टाने व्यवस्थापकाला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.