Sri Lanka crisis : राजीनामा देण्यापूर्वीच श्रीलंकेचे राष्ट्रपती श्रीलंकेतून पळाले; मालदीवला गेल्याची माहिती
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. ते 13 तारखेला म्हणजे आज राजीनामा देणार होते. मात्र राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी देश सोडल्याची माहिती समोर येत आहे.
कोलंबो : श्रीलंका (Sri Lanka) सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. अन्नधान्यापासून ते इंधनापर्यंत (Fuel) सर्वच दैनंदीन गरजेच्या वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात अशीच परिस्थिती असल्यामुळे अखेर तेथील नागरिकांचा संयम सुटला असून, लोक रस्त्यावर उतरले आहेतय. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. ते 13 तारखेला म्हणजे आज राजीनामा देणार होते. मात्र राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी देश सोडल्याची माहिती समोर येत आहे. गोटाबाया राजपक्षे हे मालदीवची राजधानी मालेला गेल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने श्रीलंकेतील काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. दुसरीकडे आंदोलकांनी सध्या राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयात आपला तळ ठोकला आहे.
पंतप्रधान कार्यालय जाळले
आंदोलकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. गेल्या शनिवारी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. आंदोलकांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केले. दरम्यान त्यानंतर शनिवारीच सांयकाळच्या सुमारास आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर देखील हल्ला केला. आंदोलक पंतप्रधान कार्यालयाकडे येत असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला, लाठीचार्ज केला. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आग लावली. आंदोलकांचा रोष लक्षात घेऊन पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. तर राष्ट्रपती राजपक्षे हे आज राजीनामा देणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांनी देश सोडल्याची माहिती समोर येत आहे. ते मालदीवची राजधानी मालेला गेल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने श्रीलंकेतील काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.
Sri Lanka President Gotabaya Rajapaksa, who is due to offer his resignation on Wednesday, has landed in Maldivian capital Malé: Sources
— Press Trust of India (@PTI_News) July 13, 2022
आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात मुक्काम
आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. त्यानंतर राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवन सोडले. राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवन सोडल्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनातच तळ ठोकला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान देखील ताब्यात घेतले आहे. जोपर्यंत राष्ट्रपती राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत राष्ट्रपती भवन सोडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयात धुमाकूळ घताला आहे. त्याचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.