Sri lanka Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे आहेत बेपत्ता; आता कशी होणार राष्ट्रपती पदाची निवड; 4 प्रश्नांमध्ये जाणून घ्या
या सर्व परिस्थितीमुळे श्रीलंकेत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेत आता राष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंकेत राष्ट्रपती पदावर जर कोणाची नेमणूक करायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी असणार आहे, त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
नवी दिल्लीः श्रीलंकेतील आर्थिक संकटाने आता भयानक रूप धारण केले आहे. श्रीलंकेत आंदोलकांचा रोष प्रचंड वाढला असून आता त्यांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) 5 जुलैपासून बेपत्ता आहेत, सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोटाबाया सुटकेससह बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Prime Minister Ranil Wickremesinghe) यांच्या मालकीच्या घरावरही आंदोलकांनी हल्ला चढविला असून त्यांचे ते खासगी घरही जाळण्यात आले आहे.
श्रीलंकेच्या संसदेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की ते आता श्रीलंकेचे कार्यवाहक म्हणून राष्ट्रपती काम पाहणार आहेत. तसेच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सभापतींकडून पायउतार होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी अध्यक्ष गोटाबाया यांना 13 जुलै रोजी राजीनामा देण्यासही सांगण्यात आले आहे.
श्रीलंकेत राजकीय पोकळी
या सर्व परिस्थितीमुळे श्रीलंकेत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेत आता राष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंकेत राष्ट्रपती पदावर जर कोणाची नेमणूक करायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी असणार आहे, त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
प्रश्न 1: राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेचे संविधान काय म्हणते?
श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार, राष्ट्रपतीने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिल्यास, संसद आपल्या कोणत्याही सदस्याला राष्ट्रपती म्हणून नियुक्त करू शकते असं श्रीलंकेच्या संविधानामध्ये म्हटले आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष उर्वरित कार्यकाळासाठी पदावर राहू शकतात.
दुसरा प्रश्न: राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकल्यानंतर किती दिवसांत अध्यक्षाची निवड करावी लागते?
राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर एक महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपती निवडला जाणे अपेक्षित आहे. तर 13 जुलै रोजी गोटाबाया यांनी राजीनामा दिल्यास श्रीलंकेला 13 ऑगस्टपर्यंत नवीन राष्ट्रपती पदावर नेमणूक करावी लागणार आहे.
तिसरा प्रश्न: नवीन राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया काय आहे?
राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर तीन दिवसांत संसदेची बैठक बोलवली जाते. त्यानंतर बैठकीत संसदेचे महासचिवांकडून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची माहिती संसदेला दिली जाते. अध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास, नवीन राष्ट्रपती गुप्त मतदानाद्वारे म्हणजेच पूर्ण बहुमताने निवडला जातो.
चौथा प्रश्न : नवा राष्ट्रपती निवडून येईपर्यंत देश कोण सांभाळणार?
श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान कार्यवाहक राष्ट्रपती होऊ शकतात, मात्र श्रीलंकेत रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांना श्रीलंकेचे हंगामी राष्ट्रपती बनवण्यात आले आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत ते हे पद सांभाळणार आहेत.