OpenAI ची पोलखोल करणारा सुचिर बालाजी कोण?; काय होते त्याचे आरोप?
सुचिर बालाजी या ओपनएआयच्या माजी संशोधकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे सूचिर मृत आढळला. पोलिसांचा अंदाज आहे की, त्यांनी आत्महत्या केली आहे. त्याने ChatGPT वर गंभीर आरोप केले होते. सुचिरने आपल्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जनरेटिव्ह एआय आणि कॉपीराईटबाबत आपले विचार मांडले होते.
सुचिर बालाजी याचा सॅन फ्रान्सिस्को येथे मृत्यू झाला आहे. सुचिर अवघ्या 26 वर्षाचा होता. त्याने ChatGPT मेकर OpenAI च्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे अचानक त्याचा मृत्यू झाल्याने संशय वाढला आहे. सॅन फ्रान्सिस्को पोलीस त्याच्या मृत्यूचा छडा लावत आहेत. मात्र, प्राथमिक तपासणीत त्यांना संशयास्पद असं काही आढळलेलं नाही. सुचिरने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
सुचिर OpenAIमध्ये रिसर्चर म्हणून काम करत होता. त्याने याच वर्षी ही कंपनी सोडली होती. कंपनी सोडल्यानंतर त्याने ChatGPT मेकरवर आरोप केले होते. ChatGPT मेकरने कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचं त्याने म्हटलं होतं.
OpenAI वरील असंख्य आरोप काय?
ChatGPT लॉन्च झाल्यानंतरच OpenAI वर अनेक प्रकारचे आरोप लावण्यात आले होते. कंपनीने या AI मॉडलला 2022मध्ये लॉन्च केलं होतं. त्यानंतर कंपनीवर कॉपीराईटबाबत अनेक केसेस दाखल झाल्या. कंपनीने एआय ट्रेनिंग देण्यासाठी दुसऱ्यांच्या कंटेटचा वापर केल्याचा आरोप मुख्य होता.
सुचिरने जीवन संपवण्यापूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्याची ही अखेरची पोस्ट होती. त्यात त्याने अनेक खुलासे केले होते. सुरुवातीला मला कॉपीराईट आणि फेयर यूजच्या बाबतचं नॉलेज नव्हतं. पण GenAI कंपन्यांवर खटले दाखल झाल्यानंतर माझा त्यात इंटरेस्ट वाढला. जेव्हा मी हे प्रकरण समजून घेतलं तेव्हा मला कळलं की, जनरेटिव्ही एआय कंपन्यांसाठी फेयर यूज शक्य नाही, असं सुचिरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुचिर बालाजी कोण आहे?
सुचिर बालाजीने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्याने Open AI आणि Scale AI मध्ये इंटर्नशिप केली होती. Open AIने सुरुवातीच्या काळात WebGPT वर काम केलं होतं. त्यानंतर GPT-4ची प्रीट्रेनिंट टीमचा तो भाग बनला होता.
जवळपास चार वर्ष ओपन एआयमध्ये काम केल्यानंतर त्याने कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. न्यूयॉर्क टाइम्सला त्याने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने काही गोष्टी सांगितल्या होत्या. हा तंत्रज्ञानाने समाजात चांगला प्रभाव पडणार नाही, वाईटच प्रभाव पडणार आहे, असं त्याने म्हटलं होतं. पण ओपन एआय कथितरित्या कॉपीराईट डेटाचा वापर करत असल्याबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली होती.
मित्रांनीच दिली माहिती
दरम्यान, सुचिर बालाजीचा मृत्यू 26 नोव्हेंबरला झाला. पण 14 डिसेंबर रोजी ही घटना उघड झाली आहे. माहितीनुसार, सुचिर मित्रांना फोन आणि मेसेजवर प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याचे मित्र त्याच्या फ्लॅटवर गेले. तेव्हा आतून दरवाजा बंद होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आत त्याचा मृतदेह सापडला.