नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांना चालण्या-फिरण्यासाठी किती दिवस लागणार? समोर आली माहिती
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीरांना स्टारलाइनरमधील बिघाडामुळे नऊ महिने अंतराळात अडकून राहावे लागले. नासाच्या प्रयत्नांनंतर ते १९ मार्चला सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर 5 जून 2024 रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले. तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले. यानंतर नासाकडून सातत्याने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर अनेक अडचणी पार केल्यानंतर आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचे स्पेसएक्स कॅप्सूल यशस्वीरित्या उतरले.
तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून परतणाऱ्या स्पेसएक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’चे लँडिंग फ्लोरिडाच्या समुद्रात झाले. यासाठी टॅलाहासी या लँडिंग झोनची निवड करण्यात आली. कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं. या लोकांना अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी 17 तास लागले. मात्र, त्यांच्या आरोग्याबाबत चिंता कायम आहे.
वैद्यकीय पथकासाठी मोठे आव्हान
अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. पृथ्वीवर परत आल्यानंतर आता त्यांना सामान्यपणे चालण्यास-फिरण्यास किती वेळ लागेल, हे सांगणे कठीण आहे. या अंतराळवीरांना वैद्यकीय पथकासाठी दोघांना सामान्य स्थितीत आणणे एक मोठे आव्हान असणार आहे. भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला. ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यानंतर सर्व अंतराळवीरांना स्ट्रेचरवर कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
नासाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा दोन्ही अंतराळवीरांना स्पेसएक्स कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना ताबडतोब स्ट्रेचरवर झोपवण्यात आले. यानंतर त्यांना दीर्घ वैद्यकीय तपासणी प्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहे. या दोघांनाही संपूर्ण शरीर तपासणी तसेच विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहे. यासोबतच त्यांना खास डाएट प्लॅनमधून जावे लागेल.
शरीर पूर्वीसारखे लवचिक कधी होणार?
या काळात त्यांना आहारतज्ञांच्या देखरेखीखाली पौष्टिक आहार घ्यावा लागेल. तसेच फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली नियमित व्यायाम करावा लागेल. जेणेकरून त्यांचे शरीर पूर्वीसारखे लवचिक होईल आणि त्यांचे स्नायू मजबूत होतील. सुनीता विल्यम्स 59 वर्षांच्या आणि बुच विल्मोर 61 वर्षांचे असल्याने त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी दीड ते दोन महिने लागू शकतात. अंतराळातील किरणोत्सर्गाने त्यांच्या शरीरावर परिणाम केला असण्याची शक्यता आहे. हे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक अशक्त दिसत आहेत. त्यांचा रंगही फिकट झाला आहे. दीर्घकाळ एकटे राहिल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला आहे.
दोन्ही अंतराळवीरांना दीर्घ काळासाठी पुनर्वसन करावे लागेल. या काळात, त्यांना आहारतज्ञांच्या देखरेखीखाली पौष्टिक आहाराचे पालन करावे लागेल. फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली नियमित व्यायाम करावा लागेल. जेणेकरून त्यांचे शरीर पूर्वीसारखे लवचिक होईल आणि त्यांचे स्नायू मजबूत होतील.
सुनीता विल्यम्स यांची 1998 मध्ये नासाने अंतराळवीर म्हणून निवड केली होती. यानंतर त्या २००६ आणि २०१२ मध्ये दोन अंतराळ मोहिमांची सदस्य होत्या. तर 61 वर्षीय विल्मोर यांनी दोन मोहिमांतर्गत 178 दिवस अंतराळात घालवले आहेत.