थेट अंतराळातून मतदान, सुनीता विल्यम्स व्होटिंग करणार, पण कसं शक्य?; काय आहे प्रक्रिया?
गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर अंतराळात आहेत. त्यांना घेऊन गेलेलं यान परत आलं. पण या दोघांना आणता आलं नाही. आता पुढच्या वर्षीत त्यांना आणलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनीता आणि विल्मोर यांनी पृथ्वीवरील लोकांनी संवाद साधला आहे. त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही आठ दिवसाच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. पण दोन महिन्याहून अधिक काळ उलटला तरी दोघे अंतराळातच आहेत. स्पेसक्राफ्टमध्ये हिलियम लिकेज झाला. त्यामुळे या दोघांचाही परतीचा प्रवास लांबला आहे. मात्र, या दोघांशिवाय आलेलं स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर व्यवस्थित आलं आहे. या पार्श्वभूमीवर सुनीताने अंतराळातून जगातील जनतेशी संवाद साधला. अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तिने अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची ही इच्छा पूर्ण केली जाणरा असल्याचं सांगितलं जात आहे.
सुनीता आणि विल्मोर गेल्या 100 दिवसांपासून अंतराळात अडकलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोघांनी अंतराळातूनच प्रेस कॉन्फरन्स घेतली. भारतीय प्रमाणेवेळेनुसार शुक्रवारी रात्री 12.15 वाजता ही पीसी झाली. यावेळी सुनीता आणि विल्मोर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
आम्ही उत्सुक
या दोघांना अमेरिकन निवडणुकीबाबतही विचारण्यात आलं. तुम्ही मतदान करणार आहात का? असा सवाल या दोघांना करण्यात आला. त्यावर या दोघांनीही अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान करणार असल्याचं सांगितलं. आम्ही आजच निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया सुरू केली आहे. ही महत्त्वाची ड्युटी आहे. नासाही यावर काम करत आहे. आम्ही कसे मतदान करू यावर नासाचं काम सुरू आहे. आम्हाला कसं मतदान करता येईल याची नासा चाचपणी करत आहे, असं विल्मोर यांनी सांगितलं. तर अंतराळातून मतदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असं सुनीताने सांगितलं.
पोस्टल बॅलेटची व्यवस्था करा
400 किलोमीटर दूर स्पेस सेंटरमध्ये सुनीता आणि विल्मोर आहेत. त्यांनी मतदान करण्यासाठी आम्हाला पोस्टल बॅलेट उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती नासाला केली आहे. सुनीता आणि विल्मोर 5 जून रोजी स्पेस सेंटरला गेले होते. 6 जून रोजी ते अंतराळात पोहोचले. त्यांना 13 जून रोजी परत यायचं होतं. पण नासाच्या बोइंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची वापसी झाली नाही. आता दोघेही 2025 ला परत येतील असं सांगितलं जात आहे.
सुनीता आणि विल्मोर काय काय म्हणाले?
खराब झालेलं स्टारलाइनर पृथ्वीवर आलं. हे स्टारलाइनर आमच्याशिवाय जात असताना पाहताना दु:ख वाटलं. मात्र, आम्हाला अशा परिस्थिती राहण्याची ट्रेनिंग मिळालेली आहे. मला अंतराळात राहायला आवडतं. ही माझी सर्वात आवडत्या जागेपैकी एक जागा आहे.
स्पेस सेंटर ही माझ्यासाठी आनंदाची जागा आहे. गरज पडली तर आम्ही या ठिकाणी 8 महिने, 9 महिने आणि 10 महिनेही थांबू शकतो. पण कुटुंब आणि श्वानांची आठवण येते.
एकाच मिशनवर दोन वेगवेगळे यान उडवण्यासाठी मी उत्साहित आहे. आम्ही टेस्टर आहोत. आमचं हेच काम आहे, असंही सुनीता म्हणाल्या.
बूच यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. मी सकाळी 4.30 वाजता उठतो. तर सुनीता 6.30 वाजता उठते. अंतराळात राहिल्याने हडांमधील होणाऱ्या घनत्वाचं नुकसान टाळण्यासाठी आम्ही दोन तास व्यायाम करतो.
स्टारलाइनरच्या पूर्वी टेस्ट पायलट म्हणून एवढा जास्त वेळ अंतराळात राहावं लागेल असं वाटलं नव्हतं. समस्या निर्माण होऊ शकतात असं वाटलं होतं. त्यामुळे परत येण्यास उशीर होऊ शकतो असंही वाटलं होतं. या व्यवसायात असं होतं, असंही विल्मोर यांनी म्हटलंय.