Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. युक्रेनला मदत करण्यासाठी अनेक देशांतील तरूण युक्रेनच्या सैन्यात भरती होत आहेत. दरम्यान, भारतातील तामिळनाडूचा (Tamilnadu) एक तरूण रशियाविरुद्धच्या रणांगणात उतरला आहे. हा तरुण युक्रेनच्या सैन्यात भरती झाला आहे. विशेष म्हणजे या भारतीय तरुणाने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आणि सैन्याच्या अनेक प्रवेश परीक्षाही दिल्या, मात्र त्याची निवड होऊ शकली नाही. या 21 वर्षीय तरुणाचे नाव सैनिकेश रविचंद्रन (Sainikesh Ravichandran) आहे. सैनिकेश मूळचा तामिळनाडूतील कोईम्बतूरचा (Coimbatore) आहे. जेव्हा भारतीय अधिकार्यांना समजले, की सैनिकेश रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सामील झाला आहे, तेव्हा त्यांनी सैनिकेशच्या पालकांची चौकशी केली. या चौकशीत असे उघड झाले, की सैनिकेश रविचंद्रन याने यापूर्वी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा दिली होती, मात्र तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही.
एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तो अमेरिकन सैन्यात सामील होऊ शकतो का हे जाणून घेण्यासाठी त्याने चेन्नईतील यूएस कॉन्सुलेटशीही संपर्क साधला. तिथूनही तो निराश झाला होता. भारतीय आणि यूएस सैन्यात सामील होण्यात अयशस्वी झाल्यानंतर, सनीकेश रविचंद्रनने 2018मध्ये युक्रेनमधील खार्किव येथील नॅशनल एरोस्पेस विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, रविचंद्रनचा कोर्स जुलै 2022मध्ये पूर्ण होणार होता. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यामुळे रविचंद्रन यांच्याशी संपर्क तुटल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले, त्यानंतर त्यांनी भारतीय दूतावासाकडे मदत मागितली, त्यानंतर त्यांनी रविचंद्रन यांच्याशी बोलणे केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या संवादादरम्यानच सैनिकेश रविचंद्रनने त्यांना युक्रेनच्या लष्करात सामील होण्याची माहिती दिली.
First foreigners have already joined International Legion, Ukraine’s volunteer military force, and are fighting outside of Kyiv.
According to the Ukrainian Ground Forces, the volunteers came from the U.S., U.K., Sweden, Lithuania, Mexico, and India.
? Ukrainian Ground Forces pic.twitter.com/2TvelInMqa
— The Kyiv Independent (@KyivIndependent) March 7, 2022
युक्रेनची मीडिया एजन्सी द कीव इंडिपेंडंटने दिलेल्या माहितीनुसार, अनेक देशांतील तरूण युक्रेनच्या सैन्यात सामील होत आहेत, या तरुणांसाठी युक्रेनच्या लष्कराने International Legion नावाचे एक नवीन ‘इंटरनॅशनल युनिट’ तयार केले आहे. युक्रेनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अमेरिका, यूके, स्वीडन, लिथुआनिया, मेक्सिको आणि भारतातील काही तरूण या युनिटमध्ये सामील झाले आहेत.
रशियन हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी परदेशी सैनिक आणि नागरिकांची आंतरराष्ट्रीय युनिट स्थापन करण्याची घोषणा केली होती. इतर देशांतील नागरिकांची युद्धात जाण्याची इच्छा लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी इतर देशांचे नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. आतापर्यंत अनेक निवृत्त अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात, जवळजवळ 3,000 अमेरिकन लोकांनी झेलेन्स्की यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय सैन्यात सामील होण्यासाठी अर्ज केला.