Tesla | टेस्ला सापडली अडचणीत, कंपनीवर झाला आता हा आरोप
एकीकडे अब्जाधीश इलॉन मस्क यांची इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला भारतात येण्याचा प्रयत्न करीत असताना तिकडे अमेरिकेत मात्र कंपनीवर नवनवीन आरोप होत असल्याने कंपनीला दंड भरावा लागत आहे.
न्युयॉर्क | 29 सप्टेंबर 2023 : अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क ( Elon Musk ) यांची इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला ( Tesla ) पुन्हा अडचणीत सापडली आहे. अमेरिकेतील समान रोजगार संधी आयोगाने कंपनीवर वांशिक भेदभाव केल्याचा खटला दाखल केला. टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रीक कार ब्रँड कॅलीफोर्निया येथील प्लांटमध्ये अल्पसंख्यांकासाठी योग्य वातावरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे.
टेस्लावर आधी ही तिच्या माजी कर्मचाऱ्यांनी फ्रेमोंट कारखान्यात वांशिक भेदभाव केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतू कंपनीने मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. परंतू यावेळी अमेरिकन समान रोजगार संधी आयोग इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीवर कारवाई करणार आहे. कंपनीवर आरोप आहे की त्यांनी अश्वेत कामगारांवर गंभीर किंवा व्यापक स्वरुपाचा वांशिक भेदभाव केला. तसेच या प्रकरणी तक्रार करणाऱ्यांवर कंपनीने कारवाई देखील केली आहे.
टेस्ला कंपनीला कॅलिफोर्नियातील नागरिक अधिकार संस्थेच्या आरोपाचाही सामना करावा लागत आहे. अश्वेत कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण केल्याच्या तक्रारींकडे डोळेझाक केल्याचा आरोप केला आहे. ओवेन डीयाज याने 2017 मध्ये टेस्ला विरोधात खटला दाखल केला होता. त्याने कंपनीवर वांशिक भेदभाव आणि शत्रूतापूर्ण वातावरण केल्याचा आरोप केला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये या प्रकरणात कोर्टाने टेस्लाला 137 मिलीयन डॉलर भरपाईचा आदेश दिला होता. त्यानंतर कंपनीने आवाहन दिले.
कंपनीच्या प्रतिमेला धक्का
अखेर टेस्ला 3.2 मिलियन डॉलर ( सुमारे 26 कोटी 58 लाख रु.) भरपाईचा आदेश मिळाला होता. याला कंपनीने आपला विजय मानला, परंतू कंपनीची प्रतिमा धुळीस मिळाली. फ्रेमोंटचा प्लांटमध्ये मॉडेल 3, मॉडेल एस, मॉडेल वाय आणि मॉडेल एक्स सारख्या लोकप्रिय मॉडेलची निर्मिती होते. कंपनीची विक्री आणि उत्पादन वाढले आहे. परंतू मॅन्युफॅक्चरींग प्लांटचा हिस्सा बनण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्वांसोबत काही योग्य घडत नाही.