आकाशातल्या थराराचा दी एंड!! जगाचा जीव टांगलेलाच, ‘त्या’ बॉम्बच्या विमानाचं काय झालं?
महान एअरलाइन्सच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बदनाम करण्यासाठी हा फेक रिपोर्ट डिझाइन करण्यात आला होता, असं प्रथम दर्शनी वाटतंय, असं महान एअरलाइन्सतर्फे सांगण्यात आलंय.
नवी दिल्लीः तेहरानहून चीनला (China) जाणाऱ्या विमानात बॉम्ब (Bomb in Flight) असल्याची बातमी पसरल्याने अवघ्या जगाच्या नजरा आज आकाशाकडे लागल्या होत्या. तेहरानहून (Tehran) निघाल्यानंतर सकाळी 9.20 वाजेच्या सुमारास विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 9.30 वाजेच्या सुमारास विमानाचे भारतात दिल्लीत लँडिंग करण्याची मागितली होती. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव ती नाकारली. पुढे दिल्ली ते जयपूर दरम्यानच्या आकाशात हे विमान तब्बल पाऊण तास घुटमळत होते. त्यानंतर ते बांग्लादेशच्या दिशेने निघाले. अखेर हे विमान नुकतेच चीनमध्ये सुरक्षितरित्या लँड झाले आहे. महान एअरलाइन्सतर्फे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
महान एअरलाइन्सची ही एअरबस 340 प्रवाशांना घेऊन इराणमधील तेहरानवरून चीनच्या ग्वांग्झू प्रांतात जात होती. दरम्यान सकाळीच पायलटला विमानात बॉम्ब असल्याचा संदेश मिळाला.
महान एअरलाइन्सने नुकत्याच जारी केलेल्या वक्तव्यानुसार, पायलटने ऑपरेशन कंट्रोल सेंटरला ही माहिती दिली होती. त्यानंतर या विमानाचं चीनमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याचं महान एअरलाइन्सने कळवलं आहे.
तब्बल सहा तासांचा हा थरार आकाशात सुरु होता. बॉम्बची बातमी घेऊन आकाशात चीनच्या दिशेनं निघालेलं हे विमान नेमकं कुठे लँडिंग करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
विमानात बॉम्ब असल्याची ही अफवाच ठरल्याचे उघडकीस आले आहे. मात्र ही अफवा कुणी पसरवली, याचा शोध घेणं सुरु आहे.
महान एअरलाइन्सच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बदनाम करण्यासाठी हा फेक रिपोर्ट डिझाइन करण्यात आला होता, असं प्रथम दर्शनी वाटतंय, असं महान एअरलाइन्सतर्फे सांगण्यात आलंय.
आज सकाळी ईराणची राजधानी तेहरानहून चीनकडे जाणाऱ्या या विमानात बॉम्ब असल्याची बातमी धडकल्याने खळबळ माजली. हे विमान तब्बल 45 मिनिटं दिल्ली आणि जयपूरच्या एअरबेसमध्ये उडत होते. मात्र त्याला लँडिंगची परवानगी मिळाली नाही.
दिल्ली एटीसीने बॉम्बची माहिती मिळताच हे विमान जयपूरकडे नेण्यास सांगितले. तेथेही परवानगी न मिळाल्याने विमान बांग्लादेशातून चीनमध्ये गेले.
हे विमान नेमकं कुठे जातेय, हे पाहण्यासाठी भारतीय वायुसेनेने एक लढाऊ विमान त्यामागे पाठवले होते. आता हे विमान सुरक्षित रित्या चीनमध्ये पोहोचलं आहे. तरीही विमान टेक ऑफ करताच बॉम्बच्या धमकीचा संदेश कुणी आणि का पाठवला होता? महान एअरलाइन्सकडून या प्रकाराची कितपत गंभीर दखल घेतली जातेय, हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत.