मांस खाताना वेदना होत होत्या… 72 दिवस ते बनले अघोरी… सुटका झाली तेव्हा…
विमानाने उड्डाण केले. काही वेळातच हवामान खराब होऊ लागले. यामुळे पायलटला बर्फाचे पर्वत दिसू शकले नाहीत. विमान 14 हजार फूट उंचीवर उडत होते. पायलटला समोरचे काही दिसत नसल्यामुळे विमान थेट अँडीज पर्वतावर आदळले.
न्यूयॉर्क | 30 जानेवारी 2024 : एखादा माणूस जगण्यासाठी दुसऱ्या माणसाचे मांस खाऊ शकतो का? नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. किळस वाटते. असा विचारही कधी मनाला शिवणार नाही. पण, जेव्हा जीवाला धोका असतो तेव्हा असे काही करायला लोक मागेपुढे पहात नाहीत. त्या अपघातातून वाचलेल्यांनी मृतांचे मांस खाऊन स्वतःचा जीव वाचवला. त्या दुर्घटनेतून वाचलेल्या एका व्यक्तीने असे करण्याचा कोणताही पश्चाताप नाही कारण ती वेळच तशीच होती. आमचा नाईलाज होता असे म्हटले आहे.
उरुग्वेच्या मॉन्टेव्हिडियो ओल्ड ख्रिश्चन क्लबचे रग्बी खेळाडू विविध देशांतील संघांमधील स्पर्धेत भाग घेण्यासाठी 13 ऑक्टोबर 1972 रोजी त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसह चिलीची राजधानी सॅंटियागोहून निघाले. त्यांना घेऊन हवाई दलाच्या विमानाने उड्डाण केले. रग्बी संघातील खेळाडू, अधिकारी, त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार होता. एकूण 45 जण त्या विमानात होते.
विमानाने उड्डाण केले. काही वेळातच हवामान खराब होऊ लागले. यामुळे पायलटला बर्फाचे पर्वत दिसू शकले नाहीत. विमान 14 हजार फूट उंचीवर उडत होते. पायलटला समोरचे काही दिसत नसल्यामुळे विमान थेट अँडीज पर्वतावर आदळले. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. 27 लोक जिवंत राहिले पण ते ही जखमी अवस्थेत होते, ते वाचले होते पण त्यांनाही जगण्याची आशा दिसत नव्हती.
अँडीजला विमान आदळल्याची माहिती मिळताच उरुग्वे सरकार तत्काळ सक्रिय झाले. प्रवाशांना वाचवण्यासाठी सरकारचे बचावकार्य सुरू झाले. पण येथेही अडचण आली. विमानाचा रंग पांढरा असल्यामुळे बर्फाळ पर्वतांमध्ये ते शोधणे फार कठीण झाले होते. सरकारने सतत 11 दिवस शोध घेतला. पण, कोणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे हे शोध कार्य थांबविण्यात आले. मात्र, अपघातात वाचलेल्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत होत्या.
विमान अपघातातून जे वाचले होते त्यांनी उपलब्ध अन्न लहान भागांमध्ये विभागले. पण, जेव्हा ते ही संपले तेव्हा त्यांनी त्यांच्याच साथीदारांच्या मृतदेहाचे तुकडे खाण्यास सुरुवात केली. ही निवड सोपी नव्हती. पण, नाईलाज होता. त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. अशा परिस्थितीत रग्बी संघाचे दोन खेळाडू नंदो पॅराडो आणि रॉबर्ट कॅनेसा यांनी हार मानली नाही. जिवंत राहण्याच्या हव्यासापोटी त्यांनी केवळ स्वत:लाच वाचवले नाही. तर, इतर 14 जणांना वाचवण्यात यश मिळवले.
अँडीज पर्वतावरील विमान दुर्घटनेतून बचावलेले रॉबर्ट कॅनेसा यांनी या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, त्या बर्फाळ टेकड्यांमध्ये आम्हाला 72 दिवस अन्नाशिवाय राहावे लागले. खाण्याची आमची ती निवड सोपी नव्हती. त्या अपघातात माझा मृत्यू झाला असता तर वाचलेल्यांनीही माझा मृतदेह खाऊन स्वत:ला वाचवावे अशी माझी इच्छा होती. हा अपघात इतिहासात ‘मिरॅकल ऑफ अँडीज’ आणि ‘अँडिस फ्लाइट डिझास्टर’ म्हणून प्रसिद्ध आहे.
कॅनेसा पुढे सांगतात, मी स्वत:ला जिवंत ठेवण्याचा मार्ग निवडला आणि त्याचा मला अभिमान आहे. आम्ही बराच काळ वेदना सहन केल्या. बर्फात राहून देवाकडे प्रार्थना करत होतो. धैर्य दाखवून आम्ही बाहेर पडलो. 12 दिवस ट्रेक केली आणि चिलीच्या लोकवस्तीच्या भागात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या साथीदारांच्या लोकेशनची माहिती रेस्क्यू टीमला दिली. त्यामुळे उर्वरित वाचलेल्यांना प्रवाशांना सुखरूप परत आणण्यात आले.