वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने गुर्मी उतरवली, मालदीवची नवी विनवणी काय?
मालदीवने T20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला आमंत्रण पाठवले आहे. म्हणाले- आम्ही टीम इंडियाचे यजमानपदासाठी आतुर आहोत. भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत करणे आणि त्यांच्या विजयाच्या आनंदात सहभागी होणे ही मालदीवसाठी मोठा सन्मान असेल.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्यावरील टिकेनंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली होती. मालदीवने केलेल्या कल्पनेपेक्षा अधिक किंमत एका चुकीमुळे मालदीवला मोजावी लागली. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार भारतीय पर्यटकांनी मालदीवला श्रीमंत केले. मात्र, तेच पर्यटक आता मालदीवला जाण्यास नकार देत आहेत. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सुमारे 40 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे मालदीवला आर्थिक संघर्षाचा सामना करावा लागत आहे. मात्र, मालदीवने आता ही चूक सुधारण्याचे ठरविले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड चॅम्पियन विश्व चषक जिंकला. हे निमित्त साधून मालदीव पर्यटक संघटना आणि पर्यटक जनसंपर्क महामंडळाने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन भारतीय संघाला खुले आमंत्रण पाठवले आहे. दोन्ही संस्थांनी संयुक्त निवेदन पाठविले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी भारतीय संघाला मालदीवमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.
‘मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशनने मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीच्या सहकार्याने टीम इंडियाला विशेष आणि खुले आमंत्रण पाठवले आहे. संस्थेचे एमडी इब्राहिम शिउरी आणि MATI चे सरचिटणीस अहमद नजीर यांनी आम्ही टीम इंडियाच्या यजमानपदासाठी उत्सुक आहोत. हे निमंत्रण मालदीव आणि भारत यांच्यातील मजबूत दीर्घकालीन सांस्कृतिक आणि क्रीडा संबंधांचे प्रतिबिंब आहे. भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत करणे. त्यांच्या विजयाच्या आनंदात सहभागी होणे हा मालदीवसाठी मोठा सन्मान असेल. या विजय सोहळ्याच्या आठवणी जपण्यासाठी त्यांना योग्य वातावरण प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांना होस्ट करण्यास उत्सुक आहोत असे इब्राहिम शिउरी यांनी म्हटले आहे.
भारतीय खेळाडूंचे मुंबईमध्ये ज्या अभूतपूर्व उत्साहात स्वागत झाले. त्यांच्या स्वागतासाठी जो जनसागर लोटला होता. त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच भारतीय पर्यटकांची संख्या घटलेल्या मालदीवने विचारपूर्वक हे पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय संघ मालदीवमध्ये आल्यास येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अधिक भारतीय पर्यटकांना आपल्याकडे खेचण्याची ही मालदीवची खेळी आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला पाठविण्यात आलेल्या निवेदनामध्ये तुम्हला अधिक सुंदर मेजवानी देताना आम्हाला अभिमान वाटेल. तुम्हाला येथे एक संस्मरणीय संध्याकाळ अनुभवता येईल. मालदीवमध्ये तुम्हाला सर्वोत्तम अनुभव मिळेल असे यात म्हटले आहे. दरम्यान, भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू सध्या ब्रेकवर आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारताचा पुढील आंतरराष्ट्रीय सामना 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या मालिकेत 3 एकदिवसीय आणि तितके टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत.