पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात कोणताच पुरावा नाही; कॅनडा तोंडघशी, जस्टिन ट्रडोंची पुन्हा फजिती
Canda India Clashes : कॅनाडा सरकार सातत्याने जागतिक मंचावर खोटं बोलत असल्याचे उघड झालं होतं. आता तर भारताविरूद्ध राणा भीमदेवी थाटात असलेले पंतप्रधान जस्टिन ट्रडो यांची मोठी फटफजिती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात या प्रकरणात काहीच पुरावे नसल्याचे कबुली त्यांनी दिली.
खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालणार्या आणि या चळवळीला खतपाणी घालणारे कॅनडा सरकार आता जागतिक मंचावर एकटे पडले आहे. त्यांची भारताला बदनाम करण्याची मोहिम उघड झाली आहे. दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येसंदर्भात कॅनडाला आता जागतिक मंचावर तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. या हत्ये प्रकरणात भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याविरोधात कुठलाही पुरावा आपल्याकडे नसल्याची कबुलीच जस्टिन ट्रुडो सरकारने दिली आहे. या हत्येसंदर्भात अद्याप कोणतीच माहिती त्यांच्याकडे नसल्याची कबुली देऊन ट्रुडो सरकार तोंडघशी पडले आहे.
खलिस्तानींच्या पाठीशी ट्रुडो सरकार
गेल्या काही वर्षांपासून कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळीला मोठे पोषक वातावरण तयार झाले आहे. यामागे येथील सरकारचा उघड उघड पाठिंबा असल्याचा आरोप होतो. अनेक हिंदू मंदिरांवर तिथे हल्ले झाले आहेत. तर दुसरीकडे हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या करण्यात आली. जून 2023 मध्ये ब्रिटिश कोलंबियात त्याची हत्या करण्यात आली. कोणताही पुरावा नसताना ट्रुडो सरकारने या हत्येत भारतीय गुप्तहेर संस्था असल्याचा आरोप केला होता. तर पंतप्रधान मोदी सरकारवर ट्रुडो यांनी आरोप केला होता. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते.
भारताने फेटाळले होते आरोप
दहशतवादी हरदीपसिंह निज्जर हत्येचा आरोप भारताने फेटाळले होते. कॅनाडा सरकारला या दहशतवाद्यांच्या कारवायांना लगाम घालता येत नसल्याने त्याचे खापर भारतावर फोडण्यात येत असल्याचा आरोप मोदी सरकारने केला होता. त्यानंतर आता पुन्हा ग्लोब अँड मेल नावाच्या एका वृ्त्तपत्रात भारताला दोषी ठरवण्यात आल्यावर त्यावर आता कॅनाडा सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात या हत्येत भारत सहभागी असल्याचा थेट कुठलाही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.
कोण आहे हा दहशतवादी निज्जर
खलिस्तानी टायगर फोर्स-KTF या दहशतवादी संघटनेचा हरदीप सिंग निज्जर प्रमुख होता. तो मुळचा पंजाबमधील आहे. जालंधरजवळील भारसिंघपूर या गावचा तो रहिवाशी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. खलिस्तानी चळवळीला मदत करत असल्याबद्दल आणि फुटीरतावादी कार्यात सहभागाबद्दल त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्याने 2021 मध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला केला होता. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षिस होते. बंदी घातलेल्या शिख्स फॉर जस्टिस या संघटनेतही तो सक्रिय होता. शिख तरुणांची माथी भडकवण्यासाठी तो काम करत होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2019 मध्ये या संघटनेवर बंदी घातली आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात राहत असल्याची पुष्टी झाली होती. जून 2023 मध्ये त्याची हत्या करण्यात आली होती.