राष्ट्रपती-गृहमंत्री विना वेतन करणार काम! या कंगाल देशातील नेत्यांना नाही मिळणार बिदागी
Economic Crisis | या देशाची आर्थिक नाडी नाजूक आहे. हा देश कंगाल झाला आहे. तो दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. प्रत्येक देशाकडे मदतीची याचना हा देश करत असताना या देशाच्या राष्ट्रपतीने वेतन न घेण्याचा स्तूत्य निर्णय घेतला आहे. गृहमंत्र्यांनी पण त्यांचे अनुकरण केले आहे.
नवी दिल्ली | 13 March 2024 : इतिहसातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटात पाकिस्तान अडकला आहे. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. जागतिक संस्थांपासून ते अनेक देशांकडे आर्थिक मदतीसाठी पाकिस्तान याचना करत आहे. देशात नुकतेच नवीन सरकार आले आहे. मंगळवारी देशाचे नवीन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी विना वेतन काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कौतूक होत असतानाच हा निर्णय दुरदृष्टीने घेतल्याचा दावा राजकीय विश्लेषक आणि विरोधक करत आहेत.
देशाच्या तिजोरीची काळजी
PTI च्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी मंगळवारी वेतन न घेण्याचा निर्णय जाहीर केला. देश गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे. देशाची आर्थिकस्थिती नाजूक आहे. त्यामुळे देशाच्या तिजोरीवर राष्ट्रपतीच्या वेतनाचा भार टाकणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये समावेश
आसिफ अली झरदारी यांच्या या निर्णयाची राष्ट्रपती सचिवालयाने पण माहिती दिली आहे. झरदारी हे देशातील श्रीमंत नेत्यांपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.8 अब्ज डॉलर असल्याचे समोर येत आहे. केवळ हाच एक स्तूत्य निर्णय त्यांनी घेतला नाही, तर त्यांच्या अजून एका निर्णयाचे जगभर कौतूक होत आहे. झरदारी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेताच त्यांची मुलगी आसिफा हिला पाकिस्तानची फर्स्ट लेडी म्हणून जाहीर केले. इतिहासात पहिल्यांदा एखाद्या राष्ट्रपतीने मुलीला फर्स्ट लेडी म्हणून दर्जा दिला आहे.
गृहमंत्री पण नाही मागे
पाकिस्तानच्या संसदेने राष्ट्रपतीचे वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार, राष्ट्रपतीचे वेतन दरमहा 8,46,550 पाकिस्तानी रुपये इतके आहे. तसेच इतर अनुषंगिक लाभ पण त्यांना देण्यात येतात. झरदारी यांनी वेतन न घेण्याची घोषण केल्यानंतर आता देशाचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी पण वेतन न घेण्याचा निर्णय जाहीर केला. सध्याचा काळ पाकिस्तानसाठी आव्हानांचा आहे. देशाची सेवा करण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.