tv9 Explainer: रशिया यूक्रेनमध्ये घुसला खरा पण गेल्या 5 दिवसात त्याला त्यात किती यश आलंय? समजून घेऊया 10 मुद्यांच्या माध्यमातून
फक्त बंदुकीच्या टोकावर यूक्रेनमध्ये राज्य करणे निव्वळ अशक्य आहे. सध्या तरी रशियाला कुठलाही स्थानिक पाठिंबा नाही. उलट यूक्रेनचे काही शेजारील देश रशियाच्या विरोधात उभे ठाकताना दिसतायत. त्यामुळेच यूक्रेन ही सर्वात मोठी चूक साबित होऊ द्यायची नसेल तर पुतीनला धोरणामध्ये बदल करावा लागेल आणि तेच पुढच्या एक दोन दिवसात दिसू शकतं असं जाणकारांना वाटतं.
Russia Ukraine War: एखादं युद्ध सुरु करणे सोपं असतं पण ते संपवणे तेवढच अवघड. त्यातल्या त्यात जो सुरु करतो त्याच्यावर दबाव अधिक असतो. कारण तो आक्रमणकर्ता असतो आणि विजयी होण्याचा त्याच्यावर दबाव असतो. जगातली कुठलीही लढाई असो की युद्ध त्याला ही वाक्य लावून तपासून बघा. खूप इतिहासात खोलवर जायची गरज नाही पण इराक-अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं काय झालं हे आठवून बघा म्हणजे रशियावर सध्या कुठला दबाव आहे याची कल्पना येईल. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर यूक्रेनमध्ये (Ukraine) रशियाला (Russia) गेल्या पाच दिवसात किती यश आलं हे पहाणेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत तरी रशियाला हवं ते यश मिळवता आलेलं नाही असं चित्रं उभं आहे पण जाणकरांची मतं मात्र पूर्णपणे वेगळी आहेत.
- यूक्रेनवर हल्ला करुन रशियाला आठवडा पूर्ण होत येईल. ह्या काळात रशियाला यूक्रेनच्या सैन्यानं चांगली टक्कर दिल्याचं चित्रं तरी आहे. रशिया आणि यूक्रेन अशा दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जातायत. त्यात आतापर्यंत रशियाचे पाच हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा यूक्रेनने केलाय. अर्थातच रशियानं हे दावे फेटाळलेत. पण वस्तुस्थिती अशीय की, प्रत्यक्ष लढाईला ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस लढाईच्या कागदावरच्या योजना कधी चौपट होतील हे सांगता येत नाही. रशियाचं सध्या तरी असंच झाल्याचं दिसतंय.
- रशिया शस्त्राअस्त्रांनी सुसज्ज देश आहे. जगभरात रशियाचा दारुगोळ्याचा व्यापार आहे. सैन्यबलही नंबर एकच्या दर्जाचं आहे. असं असतानाही यूक्रेनमध्ये रशिया अतिशय धीम्यागतीनं वाटचाल करतोय. खरं तर त्याची मजल दरमजल संथ आहे असं म्हटलं तरी चालेल. पहिल्या पाच दिवसात रशियानं दोन शहरांना टार्गेट केलंय. त्यात यूक्रेनची राजधानी कीव आणि दुसरं मोठं शहर खारकीवचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसात रशियाला ह्या दोन्ही शहरावर पूर्णपणे कब्जा मिळवता आलाय असं दिसत नाही. रशियानं यूक्रेनच्या रहिवाशी इमारतींवर हल्ले केलेत. त्यात काहींचा जीव गेलाय. काही जखमी झालेत. पण रशियालाही स्वत:ची वाहने, रणगाडे ध्वस्त होताना पहावं लागतेय. याचाच अर्थ ह्या पहिल्या टप्यात रशियाला अपेक्षीत असलेलं यश मिळालेलं नाहीय.
- यूक्रेनच्या सीमेवर रशियाचं दीड ते दोन लाखाच्या आसपास सैन्य तैनात आहे. हे सर्वच सैन्य अजून तरी यूक्रेनमध्ये दाखल झालेलं नाही. जाणकारांच्या माहितीनुसार हे सर्वच सैन्य एकाच वेळेस यूक्रेनमध्ये घुसवण्याचा रशियाचा प्लॅनही नाही. कीव, खारकीवसारखी महत्वाची शहरं छोट्या लष्करी तुकडीच्या सहाय्यानं ताब्यात घ्यायचं, तिथली व्यवस्था खिळखिळी करायची असाच पहिल्या टप्यातला पुतीनचा प्लॅन दिसतोय. त्यात काही प्रमाणात रशियाला यश येताना दिसतंय. कारण यूक्रेनमध्ये असलेले परदेशी नागरीकांनी देश सोडलाय. खुद्द यूक्रेनची जनता शेजारील पोलंड, रोमानिया अशा देशात आश्रय घेतेय. शहरं रिकामी होताना दिसतेय.
- पुतीनला काय हवं आहे? हे युद्ध कसं संपणार? ह्या प्रश्नाचं उत्तर रशियाच्या स्पुटनिक ह्या वृत्तसंस्थेनं दिलेलं आहे. यूक्रेनचा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किला सत्ता सोडायला लावणं त्याच्या जागी रशियाचं ऐकूण चालेला असा नेता राष्ट्राध्यक्ष म्हणून बसवणे हेच पुतीनला सध्या हवं आहे. त्यासाठीच पुतीननं आधी इतर सरकारांना दखल न देण्याचा इशारा दिला, एवढच नाही तर यूक्रेनच्या लष्करानं सत्ता हातात घ्यावी असं आवाहनही केलं. पण अजून तरी पुतीनला ह्या योजनेत यश आलेलं नाही. उलट झेलेन्स्कि हे जगभर हिरो म्हणून उदयाला आलेत. तर त्याच्या उलट पुतीन मात्र 21 व्या शतकाचे हिटलर म्हणून रंगवले जातायत.
- रशियानं अजून तरी जेवढं सैन्य आहे त्याच्या निम्याही सैन्याचा वापर केलेला नाही. एवढच नाही तर ज्या तीव्रतेनं रशियानं हल्ले करणे अपेक्षीत होतं तेही केलेलं नाही. हा एक लष्करी धोरणाचा भाग मानला जातोय. सैन्य रिजर्व ठेवून नंतरच्या टप्यात त्याचा वापर करणे अशीच सध्या तरी पुतीनची योजना असल्याचं जाणकारांचं म्हणने आहे. अजून रशियानं तोफा, हवाई हल्ल्यांचा वापर केलेला नाही. हा त्याचाच पुरावा.
- यूक्रेनच्या सैन्याची तटबंदी तोडण्यात रशियन लष्कराला मात्र यश आलेलं आहे. यूक्रेनच्या दक्षिण भागातून रशियन सैन्य घुसलेलं आहे. 2014 पासून तसाही क्रामिया हा भाग रशियाच्या ताब्यात आहे. तिथूनच रशियन सैन्यानं यूक्रेनमध्ये प्रवेश केलाय. जाणकारांच्या माहितीनुसार यूक्रेनला सध्या तरी स्वत:ची सैन्य तटबंदी शाबुत ठेवण्यात अपयश आलंय आणि अर्थातच रशियाला यश.
- तीन ठिकाणं रशियन लष्करासाठी महत्वाची आहेत. क्रामिया, लुहान्स्क आणि डोनेत्स्क. या तीनही ठिकाणी रशियन सैन्य तसच फुटीरतावाद्यांशी यूक्रेनचं सैन्य गेल्या 8 वर्षापासून तगडी लढाई लढतंय. आताही रशियन सैन्याला लुहान्स्क आणि डोनेत्स्कमधून पुढे आगेकुच करता आलेली नाही. असच जर क्रामियातही झालं तर मग मात्र रशियाची स्थिती वाईट होऊ शकते.
- यूक्रेनवर सत्ता गाजवायची तर राजधानी कीव हेच शहर रशियासाठी महत्वाचं आहे. त्यावर ताबा मिळण्यासाठी रशियाचे जोरदार प्रयत्न आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरची लढाई सुरु आहे. शहरी भागात लोकांचा सामनाही रशियन सैन्याला करावा लागतोय आणि ती रशियासाठी मोठी डोकेदुखी आहे. लोकांचा राग असाच राहीला तर रशियन सैन्याला रस्त्यावर वावरणेही सोपं जाणार नाही. त्यामुळे कीव ताब्यात घेणं आणि तातडीनं झेलेन्स्किला पदावरुन हटवून स्वत:चा अध्यक्ष नेमणं याच्याच प्रयत्न रशिया आहे. त्याला अजूनही तरी फार यश आलेलं नाही.
- जस जसं रशियन सैन्य पुढे जाईल तस तसं त्यांचा रशियन भूमीसोबतचं अंतर कमी होत जाईल. याचाच अर्था असा की फक्त युद्धसाम्रगीच नाही तर इतर रसद मिळवण्यासाठी रशियन सैन्यासाठी अवघड स्थिती होऊ शकते. यूक्रेन हा यूरोपातला दुसरा मोठा देश आहे. तो फ्रान्सपेक्षाही मोठा आहे. अशा भूमीवर हल्ला करणे सोप्पं आहे, एक वेळेस कब्जा करणेही सोप्पं आहे पण तो तसाच कायम ठेवणे वाटतं तेवढं सोप्पं नाही.
- यूक्रेनचा पराभव करण्यासाठी रशिया सक्षम आहे यात कुणालाच शंका नाही. दोन्हींची तुलना होऊ शकत नाही एवढा रशिया सरस आहे. पण दीड लाख सैन्याच्या बळावर तुम्ही यूक्रेनवर ताबा तर मिळवू शकाल पण तिथं राज्य करायचं तर ते स्थानिक जनतेच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. फक्त बंदुकीच्या टोकावर यूक्रेनमध्ये राज्य करणे निव्वळ अशक्य आहे. सध्या तरी रशियाला कुठलाही स्थानिक पाठिंबा नाही. उलट यूक्रेनचे काही शेजारील देश रशियाच्या विरोधात उभे ठाकताना दिसतायत. त्यामुळेच यूक्रेन ही सर्वात मोठी चूक साबित होऊ द्यायची नसेल तर पुतीनला धोरणामध्ये बदल करावा लागेल आणि तेच पुढच्या एक दोन दिवसात दिसू शकतं असं जाणकारांना वाटतं.
Non Stop LIVE Update