UK Election : ब्रिटनमध्ये होणार सत्ताबदल ? लेबर पार्टीचा झंझावात, ऋषि सुनक यांना मोठा धक्का
मतमोजणीच्या सुरुवातीच्या निकालात आतापर्यंत 650 पैकी 100 हून अधिक जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. लेबर पार्टीते नेते कीर स्टार्मर पंतप्रधान होणार हे निश्चित मानलं जातंय. ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अपेक्षेनुसार, ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्ष असेली लेबर पार्टी ही दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुरुवातीच्या निकालांमध्ये लेबर पार्टीने 102 जागा जिंकल्या आहेत तर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला आतापर्यंत केवळ नऊ जागा जिंकता आल्या आहेत. सत्तेत असलेल्या ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतदारांनी जाहीर केले आहे की ते बदलासाठी तयार आहे, असे लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर म्हणाले. स्टारमर यांनी ज्या जागेवरून निवडणूक लढवली, तेही तेथून विजयी झाले आहेत. पक्षाच्या विजयानंतर ते देशाचे पुढील पंतप्रधान होतील. दरम्यान पराभव पुढ्यात दिसू लागल्यानंतर ऋषी सुनक यांनी उद्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.
तत्पूर्वी, मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोलने देखील लेबर पार्टीच्या दणदणीत विजयाची शक्यता वर्तवली होती. बीबीसी-इप्सॉसच्या एक्झिट पोलमध्ये, कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाने 410 जागा जिंकण्याचा दावा केला आहे, तर विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ 131 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
बहुमताचा आकडा काय ?
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 650 खासदार असून बहुमतासाठी, तसेच सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 326 किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याची आवश्यकता आहे. पराभवाचे संकेत मिळाल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. एक्झिट पोलने जे अंदात वर्तवले आहेत, त्याचे प्रत्यक्ष निकालात रूपांतर झाल्यास, लेबर पार्टी प्रचंड बहुमताने सत्तेत परत येऊ शकतो आणि कीर स्टार्मर हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. यूकेमध्ये मतदान संपल्याबरोबर मतांची मोजणी सुरू झाली, परंतु 650 जागांच्या संसदेत कोण स्पष्ट विजयी होईल हे उघड होण्यासाठी काही तास लागतील. YouGov आणखी एक सर्वेक्षण संस्थेने लेबर पार्टीला 431 जागा आणि PM ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त 102 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. हे मतदान अचूक असल्यास, 650 जागांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाला जबरदस्त बहुमत मिळेल
14 वर्षांपासून कंझर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेत
कंझर्व्हेटिव्ह पक्ष गेल्या 14 वर्षांपासून सत्तेत आहे. या काळात युनायटेड किंग्डमने 5 पंतप्रधान पाहिले आहेत. 2010 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षांनी विजय मिळवल्यानंतर डेव्हिड कॅमेरून पंतप्रधान झाले. त्यानंतर, 2015 यूके निवडणुकीत, कंझर्व्हेटिव्ह पक्षाने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि कॅमेरून पुन्हा पंतप्रधान बनले. मात्र 2016 मध्ये त्यांना हे पद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी कंझर्व्हेटिव्हजनी तेरेसा मे यांना पंतप्रधान केले. 2019 पर्यंत त्या या पदावर होत्या. 2019 साली, बोरिस जॉन्सन यूकेचे पंतप्रधान झाले. मग मध्येच त्यांना पायउतार व्हावे लागले आणि लिझ ट्रस पंतप्रधान झाले. मात्र त्या पदावर फक्त 50 दिवस राहू शकल्या. त्यांच्या जागी ऋषी सुनक पंतप्रधान झाले.
भारतासाठी यूके इलेक्शन महत्वाचे का ?
भारत आणि ब्रिटन दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ प्रस्तावित मुक्त व्यापार करारावर (FTA) वाटाघाटी करत आहेत. लेबर पार्टीच्या प्रचंड विजयामुळे दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या एफटीए चर्चेची गती बदलू शकते. जर सर्वेक्षणे अचूक असतील तर इतर युरोपीय देशांप्रमाणे ब्रिटनमधील सध्याचे सरकारही बदलेल. कोविड महामारी आणि युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या संकटानंतर अनेक युरोपीय देशांमध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले. ब्रिटनमध्येही हा कल कायम राहणार असल्याचे एक्झिट पोलचे आकडे दर्शवतात.
इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड म्हणजे UK
युनायटेड किंगडम मध्ये – इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंड यांचा समावेश आहे आणि या सर्व देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका लागू होतात. यूकेमध्ये एकूण 650 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 533 जागा इंग्लंडमध्ये, 59 जागा स्कॉटलंडमध्ये, 40 जागा वेल्समध्ये आणि 18 जागा उत्तर आयर्लंडमध्ये आहेत. मात्र हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, यूकेमधील प्रत्येक देशाचे स्वतःचे सरकार असते आणि निवडणुका होत असतात.