UNHRC : पाकिस्तानची खोटेपणाची कॉमेंट्री, काश्मीरप्रश्नी भारताचे खडेबोल
पाकिस्तान खोटेपणाचा कारखाना चालवत असल्याचं भारताच्या प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंह यांनी सांगितलं.
जेनेव्हा, स्वित्झर्लंड : संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC Meeting Geneva) पाकिस्तानचा खोटेपणा भारताने जगासमोर आणला. काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचं मान्य करत पाकिस्तान खोटेपणाचा कारखाना चालवत असल्याचं भारताच्या प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंह यांनी सांगितलं. भारतीय शिष्टमंडळाने जम्मू काश्मीर प्रश्नी (UNHRC Meeting Geneva) आक्रस्ताळेपणा करणाऱ्या पाकिस्तानी बोलती बंद केली.
नरेंद्र मोदी सरकार काश्मीर घाटीत सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत आहे. नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे विकासाचा थेट फायदा लडाख आणि घाटीतील लोकांना होईल. यामुळे लैंगिक भेदभाव, बाल हक्क, शिक्षण हे आणखी चांगलं होईल आणि माहिती अधिकार लागू होईल. एवढ्या अडथळ्यानंतरही प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची कमी पडू दिलेली नाही, हळूहळू प्रतिबंध मागे घेतले जात आहेत, असं विजय ठाकूर सिंह यांनी सांगितलं.
#WATCH Secy (East) MEA at UNHRC: A delegation has given a running commentary with offensive rhetoric of false allegations & concocted charges against my country. World is aware that this narrative comes from epicentre of global terrorism, where ring leaders were sheltered for yrs pic.twitter.com/x8LL9lJyX0
— ANI (@ANI) September 10, 2019
पाकिस्तान भारतावर खोटे आरोप करत आहे. हे खोटे आरोप अशा देशातून येतात, जो दहशतवादाचा किल्ला बनलाय हे जगाला माहित आहे. तोच देश आरोप करतोय, जिथे दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा मिळते, असं म्हणत विजय ठाकूर सिंह यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला. कलम 370 हटवणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणत्याच देशाला आपल्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप चालणार नाही, भारतालाही हा हस्तक्षेप चालणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी कदाचित त्यांच्या मनाचा आवाज ऐकला. पहिल्यांदाच त्यांनी भारतीय राज्य जम्मू काश्मीर असा उल्लेख केला.