वॉशिंग्टन : अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. पूर्व सीरियामधील दहशतवादी तळांना अमेरिकेने लक्ष्य केलं. इराण समर्थित दहशतवादी गटावर अमेरिकेने ही कारवाई केली आहे. इराक आणि सीरियामधील अमेरिकन तळांवर या दहशतवादी गटांनी रॉकेट आणि ड्रोनने हल्ले केले होते. यात अमेरिकेचे 21 सैनिक जखमी झाले होते. अमेरिकेने फायटर जेट्समधून या तळांवर बॉम्बफेक केली. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सूचनेनुसार, अमेरिकन सैन्याने हे ऑपरेशन केलय. “बायडेन यांच्या सूचेनवरुन इराणच समर्थन प्राप्त असलेल्या कट्टरपंथीय संघटनेवर उत्तर सीरियामध्ये हा हवाई हल्ला करण्यात आला” असं अमेरिकन संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितलं.
अमेरिकेने ज्या गटांवर कारवाई केली, त्यांनीच अमेरिकेच्या सैन्य तळांवर हवाई हल्ले केले होते. वेगवेगळ्या हल्ल्यात 21 अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. “पूर्व सीरियामध्ये इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून दोन तळांचा वापर सुरु होता. त्यावर सेल्फ डिफेन्ससाठी आम्ही कारवाई केली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निर्देशावरुन अमेरिकन सैन्य पथकाने ही कारवाई केली” असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?
“अमेरिकेला संघर्ष वाढवायचा नाहीय. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वादात पडण्याची आमची योजना नाहीय. इराणच्या इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड्सने केलेले हल्ले आम्हाला मान्य नाहीत. अमेरिकन सैन्यावर असे हल्ले बंद झाले पाहिजेत” असं संरक्षण मंत्री ऑस्टिन म्हणाले. “इराण समर्थित गट अमेरिकन सैन्याला टार्गेट करत असतील, तर अमेरिका आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आवश्य पावल उचलायला अजिबात मागे-पुढे पाहणार नाही” असं संरक्षण मंत्री ऑस्टिन म्हणाले.
अमेरिकन तळांवर हल्ले का केलेले?
सध्या इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून दहशतवादी हल्ला केला. त्या दिवसापासून गाझा पट्टीत युद्ध सुरु झालं आहे. इस्रायली एअर फोर्स गाझा पट्टीत सतत बॉम्बफेक करतेय. अमेरिका भक्कमपणे इस्रायलच्या पाठिशी उभी आहे. अमेरिकने आपल्या युद्धनौका भूमध्य सागरात आणल्या आहेत. म्हणून इराणच समर्थन असलेल्या दहशतवादी गटांनी इराक-सीरियामधील अमेरिकन तळांवर हल्ले केले होते.