US Election 2020: ‘लोकशाहीत असं होतं, धीर धरा, आपणच जिंकणार आहोत’, बायडन यांचा पुन्हा विजयी नारा
अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मतमोजणी सुरु होऊन एक दिवसापेक्षा अधिक वेळ झाला आहे, तरीदेखील अंतिम निकाल समोर आलेले नाहीत.
मुंबई : अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या (US Presidential Election 2020) अंतिम निकालाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मतमोजणी सुरु होऊन एक दिवसापेक्षा अधिक वेळ झाला आहे, तरीदेखील अंतिम निकाल समोर आलेले नाहीत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे, तर बायडन यांनी आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळवले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. मागील 24 तासांत या आकडेवारीमध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे अनेक अमेरिकन नागरिक गोंधळले आहेत. या नागरिकांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. (US Election Live Result Update)
जो बायडन यांनी आज पुन्हा एकदा विजयी नारा दिला आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात ते समर्थकांना आणि अमेरिकन नागरिकांना उद्देशून म्हणतात की, “लोकशाहीत कधी कधी असं होतं, अशा परिस्थितीत धीर बाळगणं गरजेचं असतं. मी लोकांना शांत राहण्याचं आवाहन करतो. सिस्टिम नीट काम करत आहे. मतमोजणी लवकरच पूर्ण होईल”. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘लोकशाहीत अशा गोष्टी होत असतात, जरा धीर धरा, आपणच जिंकणार आहोत,’
Keep the faith, folks.
— Joe Biden (@JoeBiden) November 6, 2020
अंतिम निकाल स्पष्ट झालेले नसताना जो बायडन यांनी कालदेखील असाच विजयी नारा दिला होता. बायडन म्हणाले होते की, राष्ट्रध्यक्षपद हे कोणत्याही पक्षपातापासून दूर असते. हे असं पद आहे जे सर्वांचा सहभाग निश्चित करतं. त्या पदावर राहून सर्वांची कर्तव्यं पार पाडावी लागतात, मी तसंच करेन. मी असं म्हणत नाही की, आपण जिंकलोय, परंतु अंतिम निकालानंतर तुम्ही पाहाल की, विजय आपलाच झालेला असेल.
मिशिगन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये बायडन विजयी
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मेसाचुसेट्स, न्यू मेक्सिको, वरमोन्ट आणि वर्जिनियामध्ये विजय मिळवला आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे बायडन यांनी मिशिगन, विस्कॉन्सिन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्येदेखील विजय मिळवला आहे. न्यूयॉर्कमध्ये बायडन यांना 22 लाख मतं तर ट्रम्प यांना 12 लाख मतं मिळाली आहेत.
संबंधित बातम्या
US Election LIVE Updates: बायडन यांच्या ‘निवडणूक घोटाळ्याविरुद्ध’ कायदेशीर लढाई लढू : डोनाल्ड ट्रम्प
US Election 2020 LIVE : मराठमोळे श्री ठाणेदार अमेरिकेत आमदारपदी, 93 टक्के मतांसह विरोधकांचा धुव्वा
US Election 2020 Live Update: अमेरिकेत निकालापूर्वी हिंसाचाराच्या घटना, हजारो आंदोलक रस्त्यांवर
(US Election 2020 results : Joe Biden says It Happens in democracy, be patient, we’re going to win)