George Floyd: अमेरिकन न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; जॉर्ज फ्लॉईड मृत्यूप्रकरणात पोलीस अधिकारी दोषी
जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर अमेरिकेत प्रचंड जनक्षोभ उसळला होता. | George Floyd Derek Chauvin
Derek Chauvin Convicted for George Floyd Death : संपूर्ण जगात पडसाद उमटलेल्या जॉर्ज फ्लॉईड (George Floyd ) या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूप्रकरणात अमेरिकी न्यायालयाने बुधवारी ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने या खटल्यात जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याला दोषी ठरवले.
गेल्यावर्षी 25 मे रोजी पोलीस अधिकाऱ्याच्या अमानुष वागणुकीमुळे जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. या पोलीस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉईड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याची मान गुडघ्याने दाबून ठेवली होती. त्यामुळे जॉर्ज फ्लॉईड यांना श्वास घेता आला नाही. वारंवार विनवण्या करूनही डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याने शेवटपर्यंत त्यांच्या मानेवरून पाय हटवला नाही. त्यामुळे जॉर्ज फ्लॉईड यांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेसह जगभरात संतापाची लाट उसळली होती.
या घटनेनंतर डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याच्यावर खटला चालवण्यात आला होता. त्यानंतर आता न्यायालयाने डेरेक चॉविन याला सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी ठरवले आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर अमेरिकेत प्रचंड जनक्षोभ उसळला होता. ठिकठिकाणी हिंसक निदर्शने झाली होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही या घटनेचा परिणाम पाहायला मिळाला होता.
“I can’t breathe.”
Those were George Floyd’s last words.
We cannot let them die with him. We have to keep hearing them.
We must not turn away. We cannot turn away.
— President Biden (@POTUS) April 20, 2021
डेरेक चॉविनला दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा?
या खटल्यासाठी सात महिला आणि पाच पुरूष न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्यात आले होते. या खंडपीठाने तीन आठवड्यांच्या सुनावणीनंतर डेरेक चॉविन दोषी असल्याचा निकाल दिला. 12 सदस्यीय खंडपीठाने एकमताने डेरेक चॉविन दोषी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता डेरेक चॉविनला दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
Today, a jury did the right thing. But true justice requires much more. Michelle and I send our prayers to the Floyd family, and we stand with all those who are committed to guaranteeing every American the full measure of justice that George and so many others have been denied. pic.twitter.com/mihZQHqACV
— Barack Obama (@BarackObama) April 20, 2021
साक्षीदारही न्यायालयात झाले भावूक
जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला तेव्हा घटनास्थळी अनेकजण उपस्थित होते. यापैकी काहीजणांनी न्यायालयात साक्ष दिली. मिनीपोलीस पोलीस दलाच्या प्रमुखांनीही डेरेक चॉविनविरोधात साक्ष दिली. डेरेकने जॉर्ज फ्लॉईड यांची मान बराच काळ गुडघ्याने दाबून ठेवली. हे पोलीस दलाच्या नियमांना धरून नसल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय, इतर साक्षीदार न्यायालयात बोलताना भावूक झाले होते.
डेरेक चॉविनची कृष्णवर्णीयांशी क्रूर वागणूक
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलीस अधिकारी डेरेक चॉविन याने पूर्वीही कृष्णवर्णीयांवर राग काढण्यासाठी अशीच कृत्ये केल्याचे समोर आले. 2017 मध्ये डेरेक चॉविन याने एका कृष्णवर्णीय महिलेला अटक करतानाही असेच केले होते. ती महिला विरोध करत नसतानाही डेरेकने त्या महिलेला जमिनीवर पाडून तिची मान पायाने दाबून धरली होती.
डेरेक चॉविन याने कुंग फू चे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे अशाप्रकारे मान दाबून ठेवल्यास काय परिणाम होतील, हे त्याला माहिती नसेल, ही शक्यता खूपच कमी असल्याचे मत त्याचे प्रशिक्षक आंद्रे बलियान यांनी म्हटले.
(Derek Chauvin Convicted for George Floyd Death)