पासपोर्ट रद्द झाल्यास काय होतं? कोणते पर्याय असतात? शेख हसीना प्रकरणावरून जाणून घ्या काय ते
पासपोर्ट एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी असणारं महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. याशिवाय एका देशातून दुसऱ्या देशात जाताच येत नाही. त्यामुळे पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे दिसून येतं. पण हाच पासपार्ट रद्द झाला तर काय? कोणती कारवाई होते असे एक ना अनेक प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबतही असंच काहीसं झालं आहे. आता त्यांच्यापुढे काय पर्याय आहे ते जाणून घेऊयात
पासपोर्ट काढणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही. सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कुठे हे महत्त्वाचं कागदपत्रं हाती पडतं. शिक्षण, व्यवसाय आणि विदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा दस्तऐवज आहे. भारतात चार प्रकारचे पासपोर्ट मिळतात. सामान्य नागरिकांसाठीचा पासपोर्ट, कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यासाठी अधिकृत पासपोर्ट, उच्च पदस्थांसाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि विदेशात संकटात असलेल्यांसाठी आपत्कालीन पासपोर्ट जारी केला जातो. 18 वर्षांवरील नागरिकांसाठी पासपोर्टची वैधता ही 10 वर्षे, तर त्या खालील वय असलेल्यांसाठी पासपोर्ट वैधता ही 5 वर्षे असते. त्यामुळे पासपोर्ट काढणं आणि तो जपणं किती महत्त्वाचं आहे हे दिसून येतं. हा पासपोर्ट रद्द झाला तर काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना प्रकरणानंतर समजून घेता येईल. चला तर या बाबत सविस्तर जाणून घेऊयात
बांगलादेशमध्ये सध्या अस्थितरतेचं वातावरण असून राजकीय उलथापालथ झाली आहे. पंतप्रधानांवर देश सोडून जाण्याची वाईट वेळ आली. राजकीय स्थिती पाहता माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. उच्च पदस्थ असलेल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या आधारे त्या 5 ऑगस्टला भारतात आल्या आहेत. त्यांनी बांगलादेशमधून पळ काढला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. कारण बांगलादेशची सत्ता हातात असलेल्यांनी त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्टच रद्द केला आहे. डिप्लोमॅटिक पासपोर्ट असलेली व्यक्ती भारतात 45 दिवस राहू शकते. शेख हसीना यांनी भारतात 19 दिवस काढले आहेत. पण आता हा पासपोर्ट रद्द झाल्याने पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पासपोर्ट रद्द झाला तर काय होतं?
पासपोर्ट रद्द झाला तर सदर व्यक्तीचा विदेश यात्रा करण्याचा अधिकार संपुष्टात येतो. इतकंच काय तर पासपोर्ट रद्द होण्याचं कारण एखादा गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य असेल तर त्या व्यक्तीला अटकही केली जाऊ शकते किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं. त्याचबरोबर सदर व्यक्तीला मायदेशी परत पाठवलं जाऊ शकतं किंवा अटक होऊ शकते. अशा प्रकरणात सदर देश इंटरपोर्ट, दुसऱ्या देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थाना याबाबतची माहिती देतात. पण हे सर्वस्वी त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. पासपोर्ट रद्द करणाऱ्या देशाने असं करण्याचं कारण काय? त्या देशाचा कायदा काय सांगतो यावरही बरंच काही अवलंबून आहे.
मोठे गुन्हेगार, फरार असलेले आरोपी आणि राष्ट्रीय सुरक्षेत काही चुकीचं केलं तर पासपोर्ट रद्द होतो. अशा परिस्थितीत नवीन पासपोर्ट बनवणं कठीण होतं. काही प्रकरणात नवीन पासपोर्ट तयार करण्यास नकार दिला जातो. पासपोर्ट रद्द केल्यानंतर परिस्थिती निवळली तरी त्याचा परिणाम भविष्यातील घडामोडींवर होतो. त्याला व्हिसा मिळणं कठीण होतं. जर एखादी व्यक्ती व्यवसायाशी संबंधित असेल तर त्याच्या करिअरवरही परिणाम होतो.
आता शेख हसीना यांना काय करावं लागेल?
शेख हसीना यांच्याविरोधात देशभरात आतापर्यंत 50 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अपहरण आणि तसेच नरसंहाराचे गुन्हे आहेत. त्यामुळे शेख हसीना यांच्या अडचणीत दिवसागणित वाढ होत आहे. पासपोर्ट रद्द झाल्याने त्यांना आता विदेशवारी करता येणार नाही. बांगलादेश गृहमंत्रालयाचे सुरक्षा सेवा प्रभागाचे वरिष्ठ सचिव मोहम्मद मशीउ रहमान यांनी सांगितलं की, ‘एकदा का डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द झाला तर त्यांच्या कुटुंबियाचा पासपोर्टही रद्द होतो. डिप्लोमॅटिक पासपोर्ट असणाऱ्यांना सामान्य पासपोर्ट घेण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. तत्पूर्वी डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर करावा लागतो.’
सध्याची स्थिती पाहता बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मायेदशी परतण्याशिवाय पर्याय नाही, असंच दिसत आहे. बांगलादेशमध्ये जाताच त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री तौहीद हुसैन यांनी सांगितलं की, ‘बांगलादेश भारताकडे हसीना यांचं प्रत्यर्पण करण्याची मागणी करू शकतो. हसीना यांची पदावरून हाकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचं प्रत्यर्पणाची मागणी केली जाईल.’ जर भारताने या कारवाईस नकार दिला तर दोन्ही देशातील संबंध बिघडू शकतात.
प्रत्यार्पण करारामुळे भारतासमोर अडचणी!
भारत आणि बांग्लादेश यांच्यात 2013 मध्ये प्रत्यार्पण करार झाला आहे. त्यामुळे सध्याच्या बांगलादेश सरकारने भारताकडे प्रत्यार्पणाची मागणी केली तर ती टाळता येणार नाही. प्रत्यार्पण करारानुसार, व्यक्तिविरोधातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर अशा व्यक्तीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जाऊ शकते. दुसरीकडे, शेख हसीना यांनी मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचं ठपका आहे. विरोधकांचा आवाज दाबला, त्यांना तुरुंगात डांबलं, खोट्या खटल्यात अडकवलं असे आरोप आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्राचं एक पथक बांगलादेशमध्ये पोहोचलं असून प्रकरणाची चौकशी करत आहे.
कोण आहेत शेख हसीना?
शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 ला ढाक्यात झाला. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची थोरली कन्या आहे. त्यांचं शिक्षण बांगलादेशमध्येच पूर्ण झालं. शेख हसीना यांना राजकारणात तशी रूची नव्हती. 1966 मध्ये कॉलेज जीवनात त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूक लढवली आणि अध्यक्षा झाल्या. त्यानंतर वडिलांच्या आवामी लीगच्या विद्यार्थी परिषदेची कमान सांभाळली. 1975 मध्ये सैन्याच्या बंडानंतर त्यांचं कुटुंब संकटात आलं. शेख हसीना यांच्या वडिलांची आणि तीन भावांची हत्या करण्यात आली. त्यावेळेस शेख हसीना आणि तिचे पती वाजिद मिया आणि छोट्या बहिणीचा जीव वाचला. कारण त्यावेळेस हे तिघंही युरोपमध्ये होते. त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना आसरा दिला होता.
शेख हसीना बहिणीसह दिल्लीत सहा वर्षे राहिल्या. शेख हसीना 1981 मध्ये बांगलादेशमध्ये परतल्या आणि 1986 मध्ये निवडणुकीत उतरल्या. तेव्हा त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. 1991 मध्ये निवडणुकीतही फार काही यश मिळालं नाही. पण विरोधी पक्षाच्या खालिदा जिया यांच्यासोबत आघाडी करत सरकार स्थापन केलं. 1996 च्या निवडणुकीत शेख हसीना यांना बहुमत मिळालं आणि त्या पंतप्रधान झाल्या. 2001 मध्ये पुन्हा पराभव झाला. 2009 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. 2014 आणि 2018 मध्येही त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सध्या त्या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी होत्या पण देशातील बंडाळीमुळे जीवाला धोका असल्याने पळ काढावा लागला.