लस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता, WHO चा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाची लस येण्याआधी जगभरात कोरोनामुळे 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली आहे (WHO warn 20 lac corona death before Vaccine).
जिनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाची लस येण्याआधी जगभरात कोरोनामुळे 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली आहे (WHO warn 20 lac corona death before Vaccine). यात कोरोना लस तयार होण्यापासून तिचं वितरण होण्यासाठीचा काळ गृहित धरण्यात आला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार डब्ल्यूएचओचे आणीबाणी प्रमुख मायकल रयानने म्हटलं, “जर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावलं उचलली गेली नाही, तर अशास्थितीत जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढेल.”
जगभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) कहर सुरुच आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 9 लाख 89 हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा 3 कोटीच्या पुढे गेला आहे. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर पावलं उचलली गेली नाही तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 20 लाखांपर्यंत पोहचेल, अशी शक्यता डब्ल्यूएचओने (WHO) व्यक्त केली आहे.
डब्ल्यूएचओने (WHO) म्हटलं, कोरोनापासून वाचण्यासाठी जर सर्व देश एकत्र आले नाही, तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चीनमध्ये कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर 9 महिन्यांनी जगभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 10 लाख होण्याच्या मार्गावर आहे. त्या दिशेने वेगाने प्रवास होत आहे.
मायकल रयान म्हणाले, “युरोपीय नागरिकांना स्वतःला विचारायला हवं की त्यांनी लॉकडाऊन (Lockdown) न करण्याइतपत आवश्यक पावलं उचलली आहेत का? चाचणी, शोध, विलगीकरण, शारीरिक अंतर, मास्क घालणे आणि हात धुणे अशा आवश्यक गोष्टी करणं गरजेचं होतं.
जगभरात कोरोना मृत्यूंचा आकडा 10 लाखांच्या जवळ गेला आहे. याआधी स्पेनची राजधानी मॅड्रिडने कोरोना संसर्ग लक्षात घेऊन 8 जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध घातले होते. त्याचा जवळपास 10 लाख नागरिकांवर परिणाम झाला. फ्रान्सच्या दक्षिण भागात मार्सिलेत बार आणि रेस्तरा कर्मचाऱ्यांनी पुन्हा लागू केलेल्या लॉकडाऊनला विरोध केला. दुसरीकडे ब्रिटेनमध्ये काही भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :
Corona pandemic | येत्या दोन वर्षात कोरोनाचा नायनाट होईल, WHO प्रमुखांना विश्वास
WHO warn 20 lac corona death before Vaccine