इराण इस्रायलवर आज रात्री हल्ला करणार? सर्व फ्लाईट रद्द, अमेरिकाही झाली सावध
इस्रायलवर हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या ईराणच्या सोबत हेजबोल्ला, हमास, यमन येथील हुती बंडखोर यांचा देखील हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेने या क्षेत्रात आपली ताकद वाढविली आहे. अमेरिका इस्रायलवरील हल्ला परतवून लावण्यासाठी सज्ज झाला आहे.
इराण केव्हाही इस्रायलवर हल्ला करू शकतो असे म्हटले जात आहे. आज रात्रीच इराण युद्धाला तोंड फोडेल अशी भीती अमेरिकेला सतावत आहे. त्यामुळे भूमध्य सागरात अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका आणून ठेवली आहे. दुसरीकडे लुफ्तांसा या विमान कंपनीने इस्रायलला जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहे. तेल अवीव, तेहरान, बैरूत, अम्मान आणि एरबिलसाठी 21 ऑगस्टपर्यंत कोणतेही विमान उडणार नसल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी जनरल लॉयड ऑस्टिन यांनी गायडेड मिसाईल सबमरीन युएसएस जॉर्जियाला मध्य-पूर्वेत लवकर दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.घातक 154 लॅंड अटॅक टोमाहॉक क्रुझ मिसाईलने सज्ज असलेल्या या पाणबुडीला वेगाने मेडिटेरेनियन जवळ पोहचायला सांगितले आहे. तसेच तिसरे कॅरियर स्ट्राईक ग्रुप सोबत uss Abraham licoln देखील याच ठिकाणी पोहचत आहे. या ठिकाणी आधीच युएसएस थियोडोर रुझवेल्ट विमानवाहू युद्ध नौका तैनात आहे.
बदल्याच्या आगीने पेटलेला इराण
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध होऊ नये यासाठी अमेरिका आणि अन्य देशांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे ईराणने हल्ला केल्यास अधिक मोठे युद्ध होऊ नये असा प्रयत्न केला होता. परंतू इस्रायलने हमासचा प्रमुख इस्माईल हेनिया याची हत्या केल्यानंतर इराण बदला घेण्यासाठी पेटला आहे. इराण सोमवारी रात्रीच ईस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे.जगभराती सोशल मिडीयावर यासंदर्भातील बातम्या व्हायरल होत आहेत.
थियोडर रूझवेल्टची जागा अब्राहम लिंकन घेणार
अमेरिकेचे अब्राहम लिंकन ही विमानवाहू युद्धनौका आधी एशिया पॅसिफिकमध्ये होती. तिला आता मेडिटेरेनियन जाण्याचा आदेश मिळाला आहे. ती रस्त्यात आहे. तिथे असलेल्या रुझवेल्ट विमानवाहू नौकेची ती जागा घेणार आहे. रुझवेल्ट ही विमानवाहू युद्ध नौका मध्य पूर्वेतून पुन्हा अमेरिकेत जाणार आहे. जॉर्जिया पाणबुडी आणि लिंकन विमानवाहू युद्धनौका दोन्ही रस्त्यातच आहेत त्या नेमक्या मध्य – पूर्वेत कधी पोहचतील याचा उलगडा झालेला नाही.
150 टॉमहॉक मिसाईल सज्ज युएसएस जॉर्जिया पाणबुडी
युएसएस जॉर्जिया अमेरिकेची ओहीओ क्लास पाणबुडी आहे. हिला एका राज्याचे नाव दिलेले आहे.ही अशा पद्धतीची दुसरी पाणबुडी आहे. ही पाणबुडी 11 फेब्रुवारी 1984 पासून अमेरिकन नौदलात कार्यरत आहे. ही अणू इंधनावर चालणारी पाणबुडी आहे. हीचे वजन 19,050 टन असून ती 560 फूट लांबीची आहे.