पासपोर्टशिवाय होऊ शकतो का परदेश प्रवास ? हे आहेत नियम
परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट तसेच व्हीसाची देखील गरज लागते. परंतू काही देशात पासपोर्टची गरज लागत नाही. तर काही देशात केवळ पासपोर्ट लागतो व्हीसाची काही गरज लागत नाही.
नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : आपण आपल्या देशात कुठेही बिनधास्तपणे प्रवास करु शकतो. परंतू परदेश प्रवासासाठी आपल्याला अनेक नियमांचे पालन करावे लागते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हीसा अशा दोन्हींची गरज लागते. विदेश प्रवास करण्यासाठी विमानाने प्रवास करताना आपल्याला पासपोर्टची गरज लागते. परंतू विना पासपोर्टशिवाय आपण परदेशात जाऊ शकतो का ? असा सवाल काही जणांच्या मनात नक्कीच आला असेल. जगात काही देश असे आहेत जेथे प्रवास करण्यासाठी पासपोर्टची अजिबात गरज लागत नाही. परदेशात प्रवास करताना काय नेमके नियम आहेत ते आपण पाहूयात…
वेगवेगळ्या देशांचे परदेश प्रवासाचे वेगवेगळे नियम आणि अटी आहेत. परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्टची गरज लागते. पासपोर्ट नसेल तर आपल्या परदेशात जाता येत नाही. भारतातून काही देशात विना पासपोर्ट देखील प्रवास करता येतो. आपल्याला केवळ सरकारी फोटो ओळखपत्राची या देशात प्रवास करण्यासाठी आवश्यकता असते. पासपोर्टशिवाय आपल आपल्या शेजारील भूतान आणि नेपाळ या देशात पर्यटन करु शकतो.
असा आपल्याला प्रवास करता येतो
आपला शेजारील निर्सगसंपन्न देश भूतानमध्ये तुम्ही निवडणूक ओळखपत्र घेऊन जाऊ शकतो. तर लहान मुलांना जन्मप्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र, आधारकार्ड सोबत घेऊन प्रवासाला जाऊ शकता. जर तुम्हाला आपला शेजारी नेपाळला जायचे असेल तर भारतातील प्रमुख विमानतळांवरुन नेपाळची राजधानी काठमांडूला थेट विमानाने जाऊ शकतो. त्यासाठी केवळ तुम्ही भारतीय आहात ते दाखविणारे सरकारी ओळखपत्र पुरेसे आहे. त्यासाठी पासपोर्टची काही गरज नाही, आधारकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दाखवून तुम्हाला नेपाळला जाता येते.
येथे जाण्यासाठी व्हीसाची गरज नाही
भूतान आणि नेपाळला जाण्यासाठी पासपोर्टची गरज लागत नाही. तसेच काही देश असेही आहेत जेथे भारतीयांना जाण्यासाठी पासपोर्ट तर लागतो पण व्हीसाची गरज लागत नाही. जगभरात सुमारे 58 ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी व्हीसाची गरज लागत नाही. या देशात मालदीव, मॉरीशस, थायलंड, मकाऊ, श्रीलंका, भूतान, नेपाळ, केनिया, म्यानमार, कतार, कंबोडीया, युगांडा, सेशेल्स, झिम्बाब्वे आणि इराण या देशांचा समावेश आहे.