झोपेत कार चालविणाऱ्यांची खैर नाही, या टेस्टद्वारे उलगडा होणार
एखादी व्यक्ती गेल्या 24 तासात झोपली आहे की नाही याचा उलगडा आता बायोमार्कर टेस्टद्वारे होणार असल्याचे 'सायन्स ॲडव्हान्सेस जर्नल' मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली | 11 मार्च 2024 : भारतात सर्वाधिक मृत्यू रस्ते वाहन अपघातात होत असतात. वाहन अपघातातील मृत्यूमुळे कमवती तरुण पिढी नष्ट होऊन राष्ट्राच्या जीडीपीचे नुकसान होत असते. 90 टक्के वाहन अपघात मानवी चुकांमुळे होत असते. त्यात झोप पुरेशी न घेता वाहन चालविल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. आपल्या उत्साही आणि ताजेतवाने राहण्यासाठी किमान सात ते आठ तास झोपणे आवश्यक असते. वाहन चालकांना देखील सात ते आठ तासांची झोप घेणे अत्यंत गरजेचे असते. जर झोप पुरेशी घेतली नाही तर अपघात होण्याची शक्यता अधिक असते. आता पुरेशी झोप घेतलीय की नाही याची नवीन टेस्ट विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे.
वाहन चालविताना ज्या प्रमाणे वाहनचालकाने मद्य घेऊन वाहन चालविले का ? याची चाचणी घेऊन उलगडा केला जातो. तसेच आता वाहन चालकाने पुरेशी झोप घेतली होती का ? याची देखील चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती किती तास झोपला होता हे उघडकीस येणार आहे.
झोपेचा टेस्टद्वारे कसा उलगडा होणार ?
ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनच्या बर्घिंगम युनिवर्सिटीच्या संशोधकांच्या मते अपुऱ्या झोपेमुळे अनेक गंभीर आजाराने मृत्यूचा धोका वाढत असतो. सायन्स एडव्हासेज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाच्या मते आता बायोमार्कर टेस्टने एखादा व्यक्ती 24 तासात झोपला होता की नाही हे कळू शकणार आहे.
अपुऱ्या झोपेने होतात रस्ते अपघात
संशोधकासाठी हा खरोखरच रोमांचक शोध आहे. यामुळे अपुऱ्या झोपेशी संबंधित आरोग्य व्यवस्थापनात बदल होऊ शकतात. जगभरातील सुमारे 20 टक्के रस्ते अपघात अपुऱ्या झोपेमुळे होतात असे ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातील स्लीप आणि सर्केडियन सायन्सचे प्राध्यापक क्लेअर अँडरसन यांनी म्हटले आहे.
हे तर मद्यपानापेक्षा धोकादायक
‘5 तासांपेक्षा कमी झोप ही असुरक्षित ड्रायव्हींगशी संबंधित असल्याचे सबळ पुरावे आहेत, परंतु 24 तास जागे राहिल्यानंतर वाहन चालवणे हे मद्यपान करून गाडी चालवण्यापेक्षाही धोकादायक आहे असे अँडरसन यांनी सांगितले. ही चाचणी भविष्यात फॉरेन्सिक वापरासाठी देखील वापरली जाऊ शकते, परंतु पुढील पडताळणी आवश्यक आहे. ही ‘स्लीप डिप्रिव्हेशन बायोमार्कर टेस्ट’ 24 तास किंवा त्याहून अधिक काळ जागे राहणाऱ्यांना शोधून काढते, तसेच 18 तासांपर्यंत झोप न घेतलेल्यांना देखील शोधू शकते असे अँडरसन यांनी सांगितले.