नवी दिल्ली : हरी बुद्धा मागर यांनी दिव्यांग असून माऊंट एव्हरेस्ट सर केला. या यशामुळे सर्व दिव्यांगांना एकप्रकारे प्रेरणा मिळते. हरी बुद्धा मागर हे ब्रिटीश सेनेतील निवृत्त गोरखा जवान आहेत. एका दिव्यांगाने एव्हरेस्ट सर केल्याने समाजात वेगळी ओळख निर्माण केली. हिमालयीन स्की ट्रेक कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितल्यानुसार, ४३ वर्षीय हरी बुद्धा मागर यांनी कृत्रीम पायांच्या मदतीने ८ हजार ८४८ मीटर एव्हरेस्ट सर केला. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हरी बुद्धा मागर यांना दोन्ही पाय नाहीत. अफगाणिस्तानात त्यांना आपली दोन्ही पाय गमवावे लागले.
हरी बुद्धा मागर यांचा जन्म १९७९ मध्ये पश्चिमी नेपाळच्या एका गावात झाला. सुरुवातीचे शिक्षण रोलपा जिल्ह्यात झाले. रोज चपलेविना ४५ मिनिटं पायी चालत ते शाळेत जात असतं. लहानपणी कागद आणि पेन मिळत नव्हता. त्यामुळे लाकडावर खडूने लिहणे शिकले. ११ वर्षांचे असताना त्यांचं लग्न झालं.
हरी बुद्धा मागर यांनी १९९९ मध्ये ब्रिटीश सेनेला योगदान दिले. रॉयल गोरखा रायफल्सच्या माध्यमातून ब्रिटीश सेनेत सहभागी झाले. तेव्हा ते १९ वर्षांचे होते. त्यांनी पाच महाद्विपांवर सेवा दिली. एव्हरेस्टवर त्यांच्या चढाईच्या मिशनला नो लेग्स, नो लिमिट्स असे नाव देण्यात आले.
माऊंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. ८ हजार ८४८ मीटरपर्यंत उचं आहे. २०१७ मध्ये नेपाळ सरकारने दिव्यांगांना माऊंट एव्हरेस्टवर चढण्यास प्रतिबंध लागू केला. २०१८ मध्ये हरी बुद्धा मागर यांनी दिव्यांग संघटनांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथून त्यांना परवानगी मिळाली.
२०१० ची गोष्ट. हरी बुद्धा मागर अफगाणिस्तानमध्ये तैनात होते. गस्तीवर जाताना त्यांचे पाय ईआयडी विस्फोटकावर पडले. जोरदार आवाज झाला. त्यावेळी त्यांचे दोन्ही पाय निकामे झाले. हिमालयन स्की ट्रेक कंपनीकडून त्यांनी कृत्रीम पाय लावले. एव्हरेस्टवर चढणे हे त्यांचे स्वप्न होते. ते आता साकार झाले.