घरात गॅस अचानक संपतोय? ‘या’ सोप्या पद्धती वापरून आधीच जाणून घ्या किती गॅस शिल्लक ?
अनेक घरांमध्ये एलपीजी सिलिंडरचा वापर होतो, पण गॅस कधी संपेल याचा नेम नसतो. त्यामुळे स्वयंपाक अर्धवट राहणं, पाहुणे असताना गोंधळ उडणं अशा अडचणी निर्माण होतात. पण ही समस्या टाळता येऊ शकते पण या काही साध्या घरगुती ट्रिक्स वापरून तुम्ही सहज जाणून घेऊ शकता की सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे.

आपल्या घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. भारतात आजही लाखो घरांमध्ये गॅस सिलिंडर हीच मुख्य ऊर्जा स्रोत आहे. मात्र, घरगुती स्वयंपाकात सर्वात सामान्य आणि त्रासदायक समस्या म्हणजे सिलिंडरमधील गॅस अचानक संपणे. अनेकदा स्वयंपाक सुरू असताना गॅस अचानक संपतो आणि त्यामुळे अडचण निर्माण होते. पण ही समस्या टाळणं शक्य आहे, तेही फारशा किचकट उपायांशिवाय!
गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे जाणून घेण्यासाठी काही सोप्या आणि सुरक्षित पद्धती वापरल्या जाऊ शकतात. यामुळे केवळ अन्न अर्धवट राहण्याचा त्रास टळतोच, पण पर्यायी व्यवस्था करायची तयारीदेखील करता येते.
गरम पाण्याची सोपी ट्रिक
सर्वात प्रभावी आणि घरगुती उपाय म्हणजे गरम पाण्याचा प्रयोग. यासाठी एका भांड्यात थोडं पाणी गरम करा. नंतर ते पाणी गॅस सिलिंडरच्या बाजूच्या भिंतीवर ओता. काही सेकंद थांबा आणि नंतर सिलिंडरच्या त्या भागाला हात लावा. जिथे गॅस आहे तिथे सिलिंडरचा भाग थंड लागेल आणि जिथे गॅस नाही तिथे तो गरम जाणवेल. ही पद्धत अगदी सोपी असून घरच्या घरी सहज केली जाऊ शकते.
संत्र्या रंगाच्या ज्वाळांवर लक्ष ठेवा
सिलिंडरमधील गॅस कमी झाल्याचे दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे बर्नरमधून दिसणारी संत्र्या रंगाची ज्वाळा. सामान्यतः गॅस पुरेसा असताना निळ्या रंगाची ज्वाळा दिसते. मात्र, गॅस कमी होऊ लागल्यावर ज्वाळा संत्र्या रंगाची होते. यावरूनही तुम्ही अंदाज लावू शकता की गॅस संपण्याच्या मार्गावर आहे.
या साध्या पद्धती वापरून तुम्ही वेळेत अंदाज घेऊ शकता आणि नवीन गॅस सिलिंडरची ऑर्डर देऊन पर्यायी उपाय करु शकता. विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा पाहुणे आले असताना गॅस संपणे ही मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे हे उपाय लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
यासोबतच, गॅस सिलिंडर वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणेही तेवढेच आवश्यक आहे. गॅस लीक होत असल्याची शंका आल्यास लगेच एजन्सीकडे संपर्क करा आणि स्वयंपाक करताना बर्नर जवळ ज्वलनशील वस्तू ठेवू नका.
थोडक्यात, गॅस संपण्याआधीच याचा अंदाज घेणे आता शक्य आहे – तेही कोणत्याही उपकरणांशिवाय! घरगुती गरम पाणी ट्रिक आणि ज्वाळेचा रंग पाहून तुम्ही तुमच्या गॅसच्या स्थितीचा अंदाज घेऊ शकता. या माहितीचा योग्य वापर केल्यास तुमचे रोजचे स्वयंपाकाचे काम अधिक सोयीस्कर आणि सुरळीत होईल.