रुग्णालयात दाखल झालात तर चिंता नका करू, राज्य सरकारकडून मिळते तब्बल इतक्या लाखांची मदत
शिंदे सरकारनेही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाढ करून प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना प्रती कुटुंब 10 लाख इतका आरोग्य विमा सेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेचे निकष काय आहेत हे जाऊन घेऊ.
मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | राज्यातील नागरिकांसाठी राज्यशासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नावाने ओळखली जात होती. या योजनेची मर्यादा पूर्वी 1.5 लाख इतकी होती. राज्याच्या योजनेप्रमाणेच केंद्र सरकारनेही आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली आहे. ही योजनाही राज्यात 23 सप्टेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रति वर्ष 5 लाख प्रती कुटुंब इतके आरोग्य संरक्षण देण्यात येते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये याआधी ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश होता. तर, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून 1209 आजारांवर उपचार करण्यात येत होते. मात्र, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यात बदल केला. यानुसार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत नव्या 328 उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. तर, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये नवीन 147 आजार वाढविण्यात आले. त्यामुळे या दोन्ही योजना मिळून आता एकूण 1356 इतक्या आजारांवर ही योजना लागू झालीय.
जन आरोग्य विमा सेवेचे लाभार्थी कोण?
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेले पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येतो. ही आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्र कर्नाटक सीमा लगत असलेल्या सीमाभागातील नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत.
विमा संरक्षण कसे मिळते?
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला आता प्रतिवर्ष 5 लाख इतके विमा संरक्षण मिळणार आहे. पूर्वी मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण 2.5 लाख इतकी होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता या शस्त्रक्रियेसाठी 4.50 इतकी खर्च मर्यादा उपलब्ध असणार आहे.
योजनेमध्ये कोणत्या रुग्णालयांचा समावेश?
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणारे शासकीय / निमशासकीय, खाजगी, धर्मादाय संस्थेची रूग्णालयांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थी मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात या सेवेचा लाभ घेऊ शकतो.
लाभार्थी रुग्णास नि:शुल्क सेवा
लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येते. वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा आणि केशरी), फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, रुग्ण केस पेपर, शस्त्रक्रियेचा अंदाजित खर्च ही कागदपत्रे आवश्यक आहेत. तर, शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शुभ्र शिधापत्रिका, ७/१२ चा उतारा. आधार कार्ड, फोटो ओळखपत्र, रुग्ण केस पेपर, शस्त्रक्रियेचा अंदाजित खर्च ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा, भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. तसेच, या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंतचे सेवा पँकेज याचा समावेश आहे. लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमा हप्ता हा राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीला देण्यात येतो.
रुग्णालयात आरोग्य मित्राची नियुक्ती
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ज्या रुग्णालयाचा समावेश आहे अशा सर्व अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे आरोग्य मित्र रुग्णांना कोणत्या आजाराला किती मदत मिळेल, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी रुग्णाची नोंदणी, उपचारा दरम्यान सहाय्य आणि मार्गदर्शन करतात.