गॅस सिलिंडर गळतीमुळे होऊ शकतो मोठा अपघात, वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
घरांमध्ये गॅस सिलिंडर बाबत नीट दक्षता न घेतल्यामुळे अनेक अपघात झाल्याचे आपण ऐकलं असेलच. अशी काही घटना पुन्हा घडू नये त्यासाठी गॅस सिलेंडर वापरताना या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जेणे करून कोणती जीवितहानी होणार नाही.
एकेकाळी लोकांच्या घरात जेवण शिजवण्यासाठी मातीच्या चुलीचा वापर केला जात होता. त्यात अनेक ठिकाणी अजूनही काही खेड्यापाड्यांमध्ये मातीच्या चुलीचा वापर केला जात आहे. आता मात्र जवळजवळ सर्वच घरातील स्वयंपाकघरात जेवण शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. कारण सिलेंडरच्या वापरामुळे जेवणही पटकन तयार होते आणि स्वयंपाकात बरीच सोय होते.
पण स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेकदा छोट्या-छोट्या हलगर्जीपणामुळे लोकांच्या घरात गॅस सिलिंडरमुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडरमुळे होणाऱ्या स्फोटाचे अपघात टाळण्यासाठी तुम्ही सुद्धा ‘या’ गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
सिलिंडरमध्ये गळती आहे का ते तपासा
गॅस सिलिंडरमुळे होणारे स्फोट आणि गॅस सिलिंडरमुळे आग लागण्याचे अपघातांचे सर्वात मोठे कारण म्हणजे गॅस गळती. म्हणूनच तुम्ही जेव्हा गॅस सिलिंडर वापरत करत असाल तेव्हा गॅस गळती कुठून होत आहे का हे अधून मधून तपासत राहा. तुम्ही जेव्हा नवीन गॅस सिलिंडर शेगडीला लावता तेव्हा रेग्युलेटर लावण्यापूर्वी गॅसगळती होत आहे की नाही हे तपासून घ्या.
समजा तुमच्या गॅस सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती होत असल्यास एका भांड्यात पाणी घेऊन गॅस पाईप त्यावर धरून ठेवा. दरम्यान पाण्यात अधिक प्रमाणात बुडबुडे येत असतील तर गॅस गळती होत आहे असे समजा. पण जेव्हा पाण्यात हालचाल होत नसेल तर गॅस सिलिंडरची गळती होत नाही हे समजून घ्या. अश्यावेळेस गॅस सिलिंडर गळती झाल्यास गॅस एजन्सीला फोन करून त्याची माहिती द्यावी. आणि त्यांना तुमचा गॅस सिलिंडर बदलण्यास सांगा.
पाईप तपासत राहा
घरात जेव्हा गॅस गळती होते तेव्हा गॅसचा वास येतो. अशातच गॅस एजन्सीला फोन करून तुम्ही त्यांच्या कर्मचाऱ्याकडून गॅस पाईप बदलू शकता. कारण अनेकवेळा पाईप निकामी झाल्याने गॅसगळती होत असते आणि योग्य वेळी योग्य दक्षता घेतली नाहीत तर मोठी दुर्घटना घडू शकते. तुम्हाला जेव्हा गॅस गळतीचा वास येत असल्यास तेव्हा चुकूनही गॅस चालू करू नका. अशा वेळेस घरातील दारे व खिडक्या उघडून ठेवा. अशाने मोठी दुर्घटना होण्यापासून टळू शकते.