वारंवार पेनकिलर घेताय? वेळीच सावध व्हा… शरीरावर होतात गंभीर परिणाम
अनेक लोकांना वारंवार पेनकिलर घेण्याची जणू सवयच जडलेली असते. छोट्या छोट्या दुखण्याला घाबरुन अनेक जण सरळ मेडिकलवर जात पेनकिलरची मागणी करीत असतात. हे शरीरासाठी धोकेदायक ठरु शकते.
मुंबई : डोके, पाठ, कंबर, हात पाय अशा दुखण्यांवर अनेकांकडून सर्रास पेनकिलरचे (PainKillers) सेवन केले जात असते. विशेष म्हणजे अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्यांचे पाकिटच आपल्या खिशात ठेवून हवे तेव्हा पेनकिलरचा वापर करीत असल्याचे आढळून येते. पेनकिलरमुळे दुखण्यापासून तात्पुरता दिलासा मिळत असला तरी याचा दीर्घकालीन दुष्परिणाम (Side effects) शरीराला भोगावा लागत असतो. परिणामी अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेकांना थोडासाही त्रास झाला की, ते पेनकिलरचा वापर करतात आणि काही लोकांना त्याची सवय होते. पेनकिलर घेण्याची सवय (Habit) आरोग्याच्या दृष्टीने चांगली मानली जात नाही. अनेक रिपोर्ट्समध्ये असे आढळून आले आहे की पेनकिलरमुळे शरीराचे प्रचंड नुकसान होते. नेमका शरीराच्या कोणत्या भागांवर याचा परिणाम होतो ते जाणून घेऊया.
हृदयासाठी नुकसानकारक
पेनकिलरमुख तात्पुरते दुखणे कमी होत असले तरी त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर व विशेषत: ह्रदयावर होत असतो. युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रियल हॉस्पिटल रिसर्च सेंटर (CRCHUM) च्या मिशेल बल्ली यांच्या नेतृत्वाखालील एका संशोधन पथकाला असे आढळून आले, की नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) वापरल्याने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.
मेंदूवर परिणाम
‘रिट्रीट बिहेवियर हेल्थ’ या अमेरिकन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, पेन किलरचा शरीराच्या अनेक भागांवर नकारात्मक परिणाम होतो. या अहवालानुसार, पेनकिलरचा मेंदूवरही परिणाम होतो. काही पेनकिलर औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास अंतर्गत रक्तस्त्राव, धाप लागणे यासारख्या समस्या निर्माण होत असतात. दीर्घकाळ टिकणाऱ्या समस्यांमध्ये ‘गॅस्ट्रोइंटेस्टाइनल’ समस्या, ‘हार्मोनल’ असंतुलन आदींचा त्रास निर्माण होउ शकतो.
धाप लागणे
पेनकिलरमुळे श्वसनसंस्थेच्या कार्यात अडचण निर्माण होते. यामुळे गंभीर आणि जुनाट अशा दोन्ही समस्या निर्माण होत असतात. श्वसन प्रक्रियेवर याचा विपरित परिणाम होत असतो. याशिवाय जे लोक त्यांचा दीर्घकाळ वापर करतात त्यांच्या फुफ्फुसावरही याचा परिणाम होतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अनेकवेळा ‘न्यूमोनिया’सारखे आजारही यातून झाले आहे.
यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम
शरीरात यकृताला महत्व आहे. यकृताच्या माध्यमातून दुषित खराब पदार्थ आणि औषधांवर प्रक्रिया केली जाते. एखादी व्यक्ती या औषधांचा जितका जास्त वापर करते तितकाच त्याच्या यकृतावर परिणाम होतो. यामुळे यकृत नीट काम करत नाही आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात आणि दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
पोटावरही परिणाम होतो
‘ओपिओइड्स’चा पोट आणि आतड्यांवर मोठ्या वेगाने परिणाम होतो. त्याच्या वापरामुळे लोकांना बद्धकोष्ठता, सूज येणे, मळमळ आणि उलट्या सारख्या समस्या देखील होतात. पेनकिलरचा जास्त वापर झाल्यास ‘नार्कोटिक बॉवेल सिंड्रोम’ नावाचा आजार होउ शकतो. पेनकिलरमुळे पोटाचे कार्य मंदावत असते.
संबंधित बातम्या
दूधाशिवाय कॉफी पिण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिणे किती फायदेशीर आहे!
जास्त प्रमाणात चपाती खाताय? आताच व्हा सावधान ! ,जाणून घ्या यामुळे होणारे आजार..