Dragonfly : चांदोबाचे क्लिक क्लिक, या महाकाय ग्रहाच्या चंद्रामाच्या ना-ना कळा टिपणार ही संस्था..
Dragonfly : या महाकाय चांदोबावर मानवी वस्ती करता येईल का? यासाठी लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.
नेवादा, अमेरिका : पृथ्वीचा चंद्र (Earth Moon) तर आपल्या सर्वांना माहिती आहे. या चंद्रावर मोठ-मोठ्या देशांनी, आंतरराष्ट्रीय आंतराळ संस्थांनी (Space Agency) अनेकदा चढाई केली आहे. तिथे मानवी जीवन सुरु करण्यासाठीचे प्रयोगही सुरु आहेत. त्यापुढे जाऊन मानवाला मंगळ (Mars) ग्रहाने खुणावले आणि तिथेही मानवाने वसाहतीसाठीचे संशोधन सुरु केले आहे. त्यानंतर गुरु ग्रहाने (planet Jupiter) ही मानवाला भूरळ घातली आहे. आता त्यापुढे मानवी पाऊल पडत आहे.
अमेरिकेची आंतराळ संस्था (NASA) पुढील मानवी वसाहतीसाठी शनिच्या (Saturn) राशीत जाऊन बसणार आहे. शनिचा चांदोबा टायटनच्या(Titan) प्रेमात सध्या शास्त्रज्ञ अखंड बुडाले आहेत. या चंद्राचे रहस्य उलगडवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करणार आहेत.
टायटन वर नासाचे ड्रॅगनफ्लाई हेलिकॉप्टर रपेट मारणार आहे. रपेटच मारणार नाही तर त्याचे असंख्य फोटो काढून तिथे मानवी वसाहत होऊ शकते का याची चाचपणी करण्यात येणार आहे. त्यासाठी टायटनवर उतरण्यासाठीच्या जागेचे संशोधन सुरु आहे.
यापूर्वी नासाने शनिच्या चांदोबाजवळ कॅसिनी स्पेसक्राफ्ट (Cassini Spacecraft) निरीक्षणासाठी पाठविले होते. त्यामुळे खूप उपयोगी डेटा शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. या डेटाच्या आधारे लवकरच शनिच्या चंद्रावर हेलिकॉप्टर उतरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
2027 मध्ये टायटन मोहिमेचा शुभारंभ करण्यात येत आहे. या मोहिमेतील हेलिकॉप्टर 2034 मध्ये टायटनच्या कक्षेत घिरट्या घालेल. म्हणजे मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर 8 वर्षांनी मुख्य मोहिमेला सुरुवात होणार आहे. पॅराशूटच्या मदतीने हे हेलिकॉप्टर टायटनवर उतरवण्यात येईल. हेलिकॉप्टर एका वेळी 16 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
या चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. या ठिकाणी मिथेनचा पाऊस पडतो. तर काही भागात पाणी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मानवी जीवनासाठी या ठिकाणी पोषक वातावरण आहे का? याची चाचपणी करण्यात येणार आहे.