पहिल्यांदाच मोठ्या ट्रेकचा प्लॅन करत असाल तर ‘ही’ माहिती खास तुमच्यासाठी, जाणून घ्या!
ट्रेकर्सला अत्याधुनिक गिर्यारोहण साहित्याची माहिती मिळाल्यास त्यांना ट्रेकिंगचा आनंद लुटता येईल. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचा आपण वापर करायला हवा.
मुंबई : पारंपरिक साहित्य वापरणाऱ्या गिर्यारोहकांना त्यांच्या गिर्यारोहणाच्या प्रवास आणि अनुभवात निसर्गाचा आनंद लुटण्यात मर्यादा येतात. बऱ्याचदा जड आणि बाळगण्यास अवघड अशा ट्रेकिंगच्या साहित्याने गिर्यारोहणाचा आनंद घेण्यापेक्षा त्यातील अडचणींमुळे ट्रेकर्स थकून जातात. त्यामुळे अनेक ट्रेकर्सला अत्याधुनिक गिर्यारोहण साहित्याची माहिती मिळाल्यास त्यांना आनंद लुटता येईल.
वजनाने अतिशय हलक्या असलेल्या बॅग घेऊन डोंगर-दऱ्यातून अगदी वाऱ्याची झुळूक येते तसे गिर्यारोहक सहजरित्या चालत जात आहेत. अत्याधुनिक पद्धतीचे तंबू ठोकून केवळ नैसर्गिक आव्हानांपासून संरक्षणच नव्हे तर शरीर आणि मनाला आरामदायी वाटेल असे साहित्याने युक्त अशी ती जागा असेल. तसेच गिर्यारोहकांना योग्य दिशा दाखविणाऱ्या नॅव्हिगेशन सिस्टिम असतील. याने ट्रेकिंगचा तुम्हाला आनंद घेता येईल. यासंदर्भात गिर्यारोहणतज्ज्ञ श्रीकांत धुमाळे यांनी ट्रेकिंगसाठी मोलाची माहिती दिली आहे.
ट्रेकिंगच्या साहित्याच्या वजन आणि डिझाईनमध्ये अमुलाग्र बदल करणाऱ्या मटेरिअलमध्ये नायलाॅन व पाॅलिएस्टर या दोन सिंथेटिक मटेरिअल्सचा समावेश आहे. पारंपरिक साहित्यापेक्षा या नव्या साहित्याचे वजन कमी असते. त्यामुळे लांब-पल्ल्याच्या गिर्यारोहण प्रवासाकरिता ते उपयुक्त ठरते.
टिकाऊ आणि चांगल्या दर्जाच्या कापडाने तयार केलेले तंबू (टेंट) हे लवकर फाटत नाहीत किंवा तुटतही नाहीत. तसेच त्यांचे वजनही कमी असल्यामुळे गिर्यारोहणाचा उत्तम अनुभव घेता येतो. सिलनायलाॅन किंवा क्युबन फायबरने बनविलेले हे टेंट कितीही खराब हवामानात तग धरू शकतात तसेच ट्रेकर्सला झोपण्यासाठी पुरेशी जागा आणि सोप्या पद्धतीने टेंट उभारणे तसेच काढणे शक्य होते.
बहुआयामी डिझाईन्स : साहित्याच्या डिझाईन आता ट्रेकर्सच्या सोयीनुसार केल्या जात आहेत. उदाहरणार्थ बॅकपॅक आता डेपॅकमध्ये रुपांतरित करता येतात तर झोपण्यासाठी असलेली स्लिपिंग बॅग ही दुमडून छोट्या पॅकेजमध्ये ठेवता येते. विविध प्रकारच्या ट्रेकसाठी त्यामुळे पॅकिंग अधिक सोयीचे बनत आहे. खास ट्रेकिंगसाठी डिझाईन करण्यात आलेल्या बॅकपॅकमध्ये समान पद्धतीने वजनाचे विभाजन होते आणि त्यामुळे गिर्यारोहकाच्या पाठीवर तसेच खांद्यांवर ताण येत नाही.
ट्रेकिंग पोल : गिर्यारोहणाच्या प्रवासात ट्रेकर्सकरिता अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे ट्रेकिंग पोल. टिकाऊ पण वजनाने हलके असे हे ट्रेकिंग पोल ट्रेकिंग करताना तोल सांभाळण्यासाठी तसेच गुडघे आणि सांध्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. कार्बन फायबर किंवा अॅल्युमिनिअमपासून बनविलेले आणि दुमडता येतील असे ट्रेकिंग पोल ट्रेकर्सला उपयोगी ठरू शकतात. पोलची उंची कमी अधिक करता आल्यामुळे गिर्यारोहणाच्या टप्प्यातील भूपृष्ठ आणि वैयक्तिक सोयीनुसार उंची ठरवता येते.
फुटवेअर : टिकाउ, मजबूत पकड आणि पायाला आरामदायी असलेले असे शूज किंवा हायकिंग बूट ट्रेकर्सने वापरावेत. रिइन्फोर्स्ड टो-कॅप, ब्रिथेबल मटेरिअल आणि ग्रिपी आउटसोल असलेल्या फुटवेअरला अधिक प्राधान्य द्यावे. त्यामुळे ट्रेकरची चपळता वाढते आणि दीर्घपल्ल्याच्या ट्रेकमध्ये येणारा थकवा कमी होण्यास मदत होते.
मोबाईल अॅप व डिव्हाईसेस : गिर्यारोहकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन आणि सुरक्षिततेची माहिती देणारे अनेक मोबाईल अॅप्स आता विकसित झाले आहेत. जीपीएस डिव्हाईस उपकरणांमुळे ट्रेकर्सला योग्य दिशेने आणि योग्य मार्गावरून चालता येते तसेच लांब पल्ल्याच्या ट्रेकमध्ये अंतराचे भानही राहते. मोबाईलला रेंज नसली तरीसुद्धा सभोवताली वाट चुकत नाही.
फिटनेस ट्रॅकर आणि ह्रदयाचे ठोके मोजणाऱ्या उपकरणांमुळे गिर्यारोहकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत वेळोवेळी सूचना मिळत राहतात. दुखापती टाळण्यासाठी आणि परफाॅर्मन्स सुधारण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. हवामानातले बदल व त्यासंबंधी अचूक माहिती मिळविण्यासाठी पोर्टेबल वेदर माॅनिटरिंग उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे गिर्यारोहण करताना सुरक्षित कँपिंगचे ठिकाण निश्चित करण्यासाठी ट्रेकर्सला मदत होते.