आशिष सूर्यवंशी, प्रतिनिधी – पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नका, अशी सूचना लिहलेली असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावरील कर्मचारी ग्राहकांना हे सांगतात. कधी कधी तर यावरुन पंपावर भांडणंही होतात. पण कुणी ऐकलं तर नवलंच. तसं पाहायला गेलं शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मोबाईलमध्ये असा कुठलाही पार्ट नसतो की, ज्यामुळे पेट्रोलमध्ये आग लागू शकते. पण म्हणतात ना, नशिब खराब असेल तर उंटावर बसलेल्याही कुत्रं चावतं. तसेच काहीसे प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलत असताना अचानक गाडीने पेट घेतला. (Talking on a mobile phone while refueling at a petrol pump ignites a fire, find out the truth behind many videos that go viral!)
सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओ कुठला आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध ठिकाणांच्या नावाने पोस्ट करण्यात आला आहे. आपल्यासाठी व्हिडीओ कुठला आहे हे समजण्यापेक्षा, व्हिडीओत काय घडलं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याकडे येऊयात.
व्हिडीओत नक्की काय आहे?
व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावर 4 दुचाकी उभ्या असलेल्या दिसतात. त्यातील मधल्या दुचाकीवरचा व्यक्ती फोनवर बोलत आहे. बोलता बोलता हा व्यक्ती गाडीला किक मारतो, आणि गाडी थोडी पुढे नेतो. तितक्यात गाडीच्या पेट्रोल टँकजवळ त्याला आग दिसतो. तो ती आग हाताने विझवण्याचा प्रयत्न करतो. तो त्या आगीवर दोनदा फुंकरही मारतो. पण ती आग काही केल्या विझत नाही. त्यानंतर तो गाडी सोडतो आणि पळ काढतो, जशी गाडी जमिनीवर पडते, तसा आगीचा भडका उडतो. आणि सर्वजण तिथून पळ काढतात. काहीच क्षणांत गाडीची राख होते. या दुर्घटनेत तीच गाडी नाही तर तिच्या बाजूचीही गाडी पेटते. त्यानंतर पेट्रोल पंपावर फायरसेफ्टी कॉल एक्टिव्हेट होतो आणि त्यानंतर ही आग विझवली जाते.
आधी व्हिडीओ पाहा:
Talking on Mobile, kicked to start the bike, and the petrol tank ignited. Burn the bike on the spot
(It is claimed that the incident took place in Pune, but it is not yet known where the video is from.)#BikeBurn | #MobileonPetrolPump | #PetrolFire pic.twitter.com/4PguaZVVjS
— Ashish A Suryawanshi (@AshishsSpeak) October 30, 2021
मोबाईलवर बोलत असल्याने आग लागली का?
आता अनेकजण म्हणतील की मोबाईल फोनमुळे आग लागली. पण लॉजिकली पाहायला गेलं, तर मोबाईल फोनमुळे आग लागणं शक्य नाही. कारण, ठिणगी वा स्पार्क निर्माण करणारी कुठलीही गोष्ट मोबाईलमध्ये नाही. आता काहीजण म्हणतील की, मोबाईलच्या नेटवर्कमुळे आग लागते, तर तेही शक्य नाही. FCC म्हणजेच फेडरल कम्युनिकेशन कमिशन या संस्थेने या सगळ्या शक्यता नाकारल्या आहेत. मोबाईल नेटवर्कमुळे कुठल्याही इंधनात आग लागणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, शास्रज्ञ कितीही दावे करत असले तरी, अनेक ठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्हीमध्ये मोबाईलवर बोलताना आग लागल्याचं स्पष्ट दिसतं. जसं या व्हिडीओमध्येही दिसत आहे. मग, त्यामागे कारण मोबाईल नाही तर काय आहे?
कुठल्या कारणामुळे पेट्रोलमध्ये आग लागते?
खरं म्हणजे जेव्हा तुम्ही पेट्रोल भरता, तेव्हा त्याचं तातडीने हवेत रुपांतरण होतं. ते हवेत उडायला लागतं. याचवेळी कुठलाही स्पार्क झाला, तर हवेतील पेट्रोलचे कण पेटतात, आणि ते सरळ टाकीपर्यंत पोहचतात. मोबाईलमुळे कुठलंही स्पार्किंग होत नाही, मग आता तुम्ही म्हणाल हे कशाने होतं. तर यामागे स्टॅटिक एनर्जी म्हणजे स्थितीक उर्जेचा संबंध असल्याचं म्हटलं जातं. लहानपणी तुम्ही खुर्चीला कपडा मारुन मित्रांना करंट दिला असेल, किंवा खुर्चीवरुन उठल्यानंतर कुठल्याही वस्तूला हात लावला तर तुम्हाला करंट लागला असेल. हीच आहे स्थितीक उर्जा. गाडीवर बसल्यानंतर तुमच्या शरीराचं आणि गाडीच्या शीटचं घर्षण होतं, त्यातून ही उर्जा तयार होते, त्यात जर तुम्ही रबरी तळ असलेले शूज वा चप्पल घातलेली असेल, तर ही उर्जा तुमच्यातच राहते, आणि तितक्यात जर तुम्ही पेट्रोलच्या टाकीला वा कुठल्याही मेटलच्या गोष्टीला स्पर्श केला तर त्यातून हा स्पार्क तयार होतो. आणि याच स्पार्कच्या संपर्कात येऊन आग लागण्याची शक्यता असते.
या व्हिडीओंतील घटनेत नक्की काय झालं असण्याची शक्यता आहे?
खरं म्हणजे या व्हिडीओत मोबाईल फोन सर्वात आधी दिसतो. पण त्यातून आग लागण्याची शक्यता जवळपास नाहीच. दुसरं स्थितीक उर्जेमुळे ही लागलेली असू शकते. आणि तिसरं कारण, ज्याकडे आपण पाहूनपण दुर्लक्ष करतो, ते कारण म्हणजे खुद्द ही दुचाकी. नीट पाहा या व्हिडीओ हा व्यक्ती आधीपासून मोबाईलवर बोलत आहे, पण तोपर्यंत काहीही घडलेलं नाही. घडलं कधी तेही पाहा. घडलं तेव्हा जेव्हा या व्यक्तीने गाडी सुरु केली. सुरु कशी केली तेही महत्त्वाचं आहे. या व्यक्तीने गाडीला किक मारली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, गाडीला किक मारतेवेळी स्पार्क निघू शकतो. हेच नाही तर गाडी सुरु करताना हेडलाईट सुरु राहिली वा इंडिकेटर सुरु असेल तर त्यात अचानक पॉवर आल्याने स्पार्किंग होते. आणि ही स्पार्किंग पेट्रोलला पेटवण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे या प्रकरणातरी खुद्द गाडीच गाडी पेटवण्याचं सर्वात मोठं कारण दिसते. हेच नाही तर याचा अर्थ या व्यक्तीने गाडीच्या पेट्रोल टँकचं झाकणंही व्यवस्थित लावलेलं नाही, किंवा ते झाकणं खराब झालेलं आहे, कारण गाडी खाली पडताच पेट्रोलही बाहेर आलं आणि अख्खी गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली.
हेही वाचा: