अंधांसाठी मोठी बातमी, डोळ्याचं संपूर्ण ट्रान्सप्लांट ऑपरेशन झालं यशस्वी
यापूर्वी काही प्राण्यांमध्ये संपूर्ण डोळ्याचे ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. परंतू त्यातील यश अत्यंत कमी प्रमाणात आले होते. परंतू एखाद्या मानवावर पहिल्यांदाच यशस्वी आय ट्रान्सप्लांट करण्यात आले आहे.
मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : शरीरातील सर्वात नाजूक अवयव समजला जाणारा डोळ्याचे आता संपूर्ण ट्रान्सप्लांट करण्यात यश आले आहे. जगात अंधत्व आल्याने फार मोठ्या लोकसंख्येला अडचणीला सामोरे जावे लागते. अंधांना संपूर्ण आयुष्य अंधकारात काढावे लागते. जगात जवळपास 37 दशलक्ष लोकांना म्हणजेच 3.7 कोटी लोकांना अंधत्वाचा सामना करावा लागत आहे. अशा दृष्टीहीन लोकांच्या जीवनात नवा प्रकाश देणारी बातमी आली आहे. जर तुमच्या जवळ आरामाच्या प्रत्येक वस्तू उपलब्ध आहेत, परंतू तुमच्याकडे त्या सुखाचा आनंद घेणारी डोळेच नसतील जर जग व्यर्थ आहे. अशा अंध:कारात चाचपडत असलेल्या व्यक्तीसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील डॉक्टरांच्या टीमला एन्टायर आय ट्रांन्सप्लांट ऑपरेशनमध्ये यश आले आहे. मेडीकल सायन्समधील हे मोठे यश मानले जात आहे.
अंधत्व येण्याची अनेक कारणे आहेत. काही प्रकरणात दृष्टी परत मिळविण्यात यश देखील मिळते. वाढत्या वयानूसार आपली दृष्टी अधू होत जाते. त्यामुळे आपली दृष्टी आपण गमावणार तर नाही ना अशी भीती प्रत्येकाला वाटत असते. डोळ्यांनी धुरकट दिसण्यामागे बरेचदा डोळ्यात मोतीबिंदू झाल्याचे कारण असते. मोती बिंदू हा प्रकार वाढत्या वयानूसार होतो. आणि ऑपरेशनने मोतीबिंदूची समस्या दूर करता येते. काही वेळा दृष्टीअधू असण्याला काही जन्मजात कारणे असतात. तसेच अपघाताने देखील दृष्टी जाते. जर अपघाताने दृष्टी गेली तर कॉर्निया ट्रान्सप्लांट केले जाते. यात काही पेशींना काढून अंधत्वावर विजय मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू जर जन्मजात अंधत्व असेल तर आयबॉल, रक्त पुरवठा आणि ऑप्टीक नर्व्हशी संबंधित समस्या जटील असते.
काय असते एन्टायर आय ट्रान्सप्लांट
एन्टायर आय ट्रान्सप्लांटमध्ये आयबॉल, रक्त पुरवठा आणि मेंदूशी संबंधित ऑप्टिक नर्व्हचे ऑपरेशन केले जाते. आतापर्यंत संपूर्ण डोळ्याचं ट्रान्सप्लांट शक्य झाले नव्हते. परंतू न्यूयॉर्क येथील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य केले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेच्या मते डोनरच्या चेहऱ्याच्या काही भागासह त्याच्या डाव्या डोळ्याला काढण्यात आले. ज्यात रक्त पुरवठा करणाऱ्या टिश्यूसह ऑप्टिक नर्व्हचा देखील समावेश होता. अराकांस येथे रहाणाऱ्या आरोन जेम्स यांच्यावर हे ट्रान्सप्लांट करण्यात आले.
हे एक मोठे यश आहे
ट्रासप्लाट करणारे डॉ. एडुऑर्डो रोड्रिग्वेज यांनी सांगितले की हे मेडीकल सायन्समधील मोठे यश आहे. यापूर्वी काही प्राण्यांमध्ये संपूर्ण डोळ्याचे ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. परंतू त्यातील यश अत्यंत कमी प्रमाणात आले होते. परंतू एखाद्या मानवावर पहिल्यांदाच यशस्वी आय ट्रान्सप्लांट करण्यात आले आहे. या ऑपरेशनबद्दल आणखी एक नेत्रतज्ज्ञ वैदेही डेडानिया यांनी सांगितले की रक्त पुरवठा, रेटीनावरील दबावासह ऑप्टीक नर्व्ह देखील चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. आम्हाला आशा आहे की त्यांना दिसू शकेल. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोचे प्रोफेसर किया वॉशिंग्टन यांनी म्हटले आहे की हे एक मोठे यश आहे.