रक्षाबंधनाला एसटीला 121 कोटी रुपयांची ओवाळणी, यंदाचा आर्थिक वर्षातला उत्पन्नाचा रेकॉर्ड तोडला

| Updated on: Aug 21, 2024 | 3:48 PM

एसटीला कोरोना काळापूर्वी दररोज 22 कोटीची उत्पन्न मिळत होते. आता हळूहळू एसटी आर्थिक संकटातून बाहेर येत आहे. एसटीला लवकरच अशोक लेलॅण्डच्या 2000 बसेस मिळणार आहेत.

रक्षाबंधनाला एसटीला 121 कोटी रुपयांची ओवाळणी, यंदाचा आर्थिक वर्षातला उत्पन्नाचा रेकॉर्ड तोडला
MSRTC BUS 1
Follow us on

यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून सलग सुट्या आल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रवासी वाढून महामंडळाच्या तिजोरीत 121 कोटींची भर पडली आहे.  17 ते 20 ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे 20 ऑगस्ट रोजी  एका दिवशीच तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठा तोटा झाला होता. त्यानंतर आता हळूहळू एसटी महामंडलाचा गाडा रुळांवर येत आहे.

दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधन दिवशी म्हणजे सोमवारी 30 कोटी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल 35 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे आभार

या दोन दिवसात 1 कोटी 6 लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल 50 लाख आहे. रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी आभार मानले आहेत. घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. एसटी महामंडळाला आता दररोज 13 ते 16 लाखांचे उत्पन्न मिळत असते. कोरोना काळापूर्वी एसटीला दररोज 22 कोटी उत्पन्न मिळत होते.