तुळजाभवानी मातेची 125 फूट उंच मूर्ती, 11 कोटी खर्च
तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Mandir) संस्थानाने तुळजाभवानी मातेची (Tuljabhavani Mata) 125 फूट उंचीची भव्य दिव्य मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी अंदाजे 11 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. घाटशीळ येथील डोंगरावर ही मूर्ती उभारण्यात येईल.
उस्मानाबाद : जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Mandir) संस्थानाने तुळजाभवानी मातेची (Tuljabhavani Mata) 125 फूट उंचीची भव्य दिव्य मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी अंदाजे 11 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तुळजापूर (Tuljapur) शहरात येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाची सोय व्हावी. तुळजापूर शहरापासून जाणाऱ्या भक्तांना तुळजाभवानी मातेचे दर्शन व्हावे यासाठी ही भव्य मूर्ती स्थापन करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. घाटशीळ येथील डोंगरावर ही मूर्ती उभारण्यात येईल.
तुळजापूर मंदिर प्रशासन लवकरच या कामाला सुरुवात करेल, अशी माहिती नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांनी दिली. तुळजापूर शहरातून सोलापूरकडे जाणाऱ्या घाटशीळ येथे बालाघाट डोंगर आहे. या डोंगरावरच तुळजाभवानी मातेची मूर्ती उभारली जाईल. यामुळे पर्यटनातही वाढ होईल. या निर्णयाचे पुजारी आणि भाविकांकडूनही स्वागत केले जात असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
ज्या भाविकांना तुळजापूर शहराजवळून जाताना गर्दीमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे तुळजाभवानीचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा भक्तांना दूरवरुन देवीचे दर्शन घेता येईल, अशी माहिती मंदिर पुजाऱ्यांनी दिली.