लालपरी ठरली कोकणची राणी..तब्बल अडीच लाख चाकरमान्यांची सुरक्षित वाहतूक
चाकरमान्यांच्या आता परतीच्या प्रवासाची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण आणि व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : कोकणातील माणसाचं बाप्पाशी प्रेमाचे अतूट नातं आहे. कोकणी माणूस गणपती चार दिवस गावी जाऊन येणारच अशी त्याची ख्याती. परंतू यंदा एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी संपाची हाक दिली आणि चाकरमान्यांचा काळजाचा ठोका चुकला. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांना नाराज न करता पगारवाढ जाहीर केली आणि संप संपला. मग चाकरमान्यांना घेऊन लालपरी कोकणात निघाल्या. आता परतीच्या प्रवासासाठी पुन्हा एसटी सज्ज झाली आहे. कोकणात एसटीच्या वैयक्तिक तसेच ग्रुप आरक्षण सेवेमुळे तब्बल अडीच लाख चाकरमानी कोकणात सुखरुप आले आहेत. तसेच आता पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत.
गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर येथून सुमारे अडीच लाखाहून अधिक चाकरमानी लालपरी एसटीने कोकणात गेल्या पाच दिवसात रवाना झाले होते. तब्बल पाच हजाराहून अधिक बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 3 ते 8 सप्टेंबर या काळामध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत लालपरीने केलेल्या नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल पाच बसेसद्वारे अडीच लाख पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली.
एसटीच्या गणेश भक्त स्पेशल गाड्यांच्या वाहतूकीसाठी राज्यातील विविध आगारातून दहा हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आले होते.आणि शिस्तीने ही एसटीची ही प्रचंड वाहतूक व्यवस्था सुरक्षित पार पाडली आहे. याबद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आता 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी देखील कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण आणि व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सुखकर व्हावा म्हणून
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, 3 ते 8 सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठीक ठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड आणि माणगाव आगारात 100 बसेस तैनात ठेवल्या होत्या. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात आली होती.