देशभरात पुराचं थैमान, आतापर्यंत 212 नागरिकांचा मृत्यू
देशभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात मोठ्या प्रमाणात वित्तहानीसह जीवितहानी देखील होत आहे. आतापर्यंत देशभरातील 9 राज्यांमध्ये पुरामुळे 212 नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे.
नवी दिल्ली: देशभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात मोठ्या प्रमाणात वित्तहानीसह जीवितहानी देखील होत आहे. आतापर्यंत देशभरातील 9 राज्यांमध्ये पुरामुळे 212 नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तसेच लाखो नागरिकांनी आपले घर गमावले आहे.
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे तयार झालेल्या पुरस्थितीत आतापर्यंत 67 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2.54 लाख नागरिकांना स्थलांतरित करुन मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. कर्नाटकमधील पुरात मृतांची संख्या 40 पर्यंत गेली आहे. महाराष्ट्रात देखील आतापर्यंत 40 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथे 3.78 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. अजूनही अनेक ठिकाणी पुराचे थैमान सुरुच आहे.
गुजरातमध्ये आलेल्या महापुराने तेथील जनजीवन देखील विस्कळीत केले आहे. तेथे आतापर्यंत 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील पुराने 25 हून अधिक लोकांचे जीव घेतले आहेत. या ठिकाणी 2 विद्यार्थी पुरात वाहून गेले. गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (11 ऑगस्ट) कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाची हवाई पहाणी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा देखील शाह यांच्यासोबत होते. शाह यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन बचाव कार्याची माहिती घेतली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील कोझिकोड येथे जाऊन पूरग्रस्त भागात भेट दिली. त्यांनी प्रथम कवलपारा येथील गिरजाघर येथे भेट दिली. या ठिकाणी 360 नागरिकांनी आसरा घेतला होता. यावेळी राहुल गांधींनी उपस्थित पूरग्रस्तांच्या अडचणी ऐकल्या आणि शक्य ती पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले.