जम्मू-काश्मीरमध्ये पाच दहशतवादी ठार, तीन गुप्तहेर अटकेत
जम्मू-काश्मीरमध्ये गुप्तचर संस्था आणि जम्मू पोलिसांनी तीन गुप्तहेरांना अटक केली आहे. या गुप्तहेरांवर पाकिस्तानसाठी काम करत असल्याचा आरोप आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गुप्तचर संस्थांना मोठं यश मिळालं आहे. गुप्तचर संस्था आणि जम्मू पोलिसांनी तीन गुप्तहेरांना अटक केली आहे. दुसरीकडे, पुलवामा येथील सुरक्षा दलाचे जवान आणि दहशवाद्यांमधील चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मात्र, या चकमकीत पोलीस दलाचे दोन अधिकारीही शहीद झाले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर, डोडा आणि कठुआ येथून तीन गुप्तहेरांना अटक करण्यात आली. गुप्तचर संस्था आणि जम्मू पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईने मोठा दहशतवादी कट उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे देशावरील मोठं संकट टळलं आहे.गेल्या आठवडाभरात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली. हे गुप्तहेर पाकिस्तानसाठी काम करत असल्याचा आरोप आहे.
पुलवामा येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. तर यामध्ये पोलीस दलाचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. ही चकमक लसीपोराच्या पंजरान गावात झाली. ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत भारतीय सेनेला मोठं यश प्राप्त झालं. वुथमुल येथील रहिवासी सलमान खान, तुजान येथील रहिवासी शबीर अहमद डार, अरिहलचा इमरान अहमद भट आणि पंजिरीन रहिवासी आसिफ हुसैन गनई या चार दहशवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.
या चार दहशतवाद्यांपैकी सलमान खान आणि शबीर हे दोघे पोलीस दलात होते. गुरुवारी हे दोघे त्यांच्या बंदुकीसह फरार झाले. त्यानंतर ते दहशतवाद्यांच्या गटात सामील झाले. या चकमकीत ठार करण्यात आलेले चारही दहशतवादी यांचे जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याची माहिती लष्कराने दिली.