पुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला!
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा रस्त्याने प्रवास करताना आपण अपघात झाल्याचे पाहतो. ते पाहून थांबतो आणि चौकशीही करतो. मात्र, अशावेळी त्या अपघातात आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यास?
पुणे: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा रस्त्याने प्रवास करताना आपण अपघात झाल्याचे पाहतो. ते पाहून थांबतो आणि चौकशीही करतो. मात्र, अशावेळी त्या अपघातात आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यास? हे ऐकायला विचित्र वाटेल पण लोणीकाळभोर येथील अपघातात असाच काहिसा प्रकार नुर मोहम्मद दारा याच्याबाबत झाला आहे. नुरचा भाऊ पुण्याहून घरी जाताना एका अपघाताच्या ठिकाणी गर्दी झाल्याचे पाहून थांबला, मात्र त्या अपघातात आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याला धक्काच बसला.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मित्रांसोबत सहलीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. मात्र, घरच्यांना बाहेर पडणाऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी लागून राहते. अशातच अचानक घरातील सदस्याच्या मृत्यूची बातमी आली, तर ते कुटुंबच कोलमडतं. असाच प्रकार नुरबाबतही झाला.
नुर लोणी काळभोर येथील एका महाविद्यालयात नोकरी करत बी. ए. चं शिक्षण घेत होता. पावसाळा सुरु झाल्यानं तो मित्रांसह रायगड पाहायला बाहेर पडला. मात्र, तो घरी आलाच नाही. लोणीकाळभोरजवळ अर्टिका आणि ट्रकच्या भीषण अपघातात 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यात नुर मोहम्मद दारा याचाही समावेश आहे. त्याच्या मृत्यूची बातमी विचित्रपणे त्याच्या घरच्यांपर्यंत पोहचली आणि हे ऐकून त्याच्या घरचे अगदी कोलमडले. नुरचा भाऊ पुण्यातून रात्री घरी जात होता. तेव्हा वाटेत त्याला एका अपघाताच्या ठिकाणी गर्दी झाल्याचे पाहून तो थांबला. जवळ गेल्यानंतर मात्र त्याला अपघातात आपलाच भावाचा मृत्यू झाल्याचे समजले. यानंतर त्याला इतका धक्का बसला की काहीवेळ त्याला बोलताही आले नाही.
घरापासून काही वेळाच्या अंतरावर असतानाच काळाने घाला घातला
नुर शुक्रवारी (19 जुलै) सकाळी साडेसहाच्या सुमारास रायगडला जाण्यासाठी घरातून मित्रांसोबत बाहेर पडला. रात्री घरी येताना पुण्यात आल्यावर त्याच्या घरच्यांनी फोन केला. तेव्हा काही वेळातच घरी पोहचत असल्याचे त्याने सांगितले. पण त्यानंतर घरापासून काही वेळाच्या अंतरावर असतानाच त्याच्यासह मित्रांवर काळाने घाला घातला. नुर आणि त्याचे मित्र प्रवास करत असेलल्या अर्टिका कारने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने. कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला.
‘आई नको म्हणत होती मात्र मित्र आले आणि घेऊन गेले’
नुर मोहम्मद दाराला बाहेर जाण्यासाठी त्याची आई नको म्हणत होती. मात्र, सकाळी मित्र आले आणि त्यांनी आग्रह करत नुरला सोबत नेले. त्यानंतर आई मुलगा परतेल या आशेने वाट पाहत बसली. मात्र, अखेर तिला आपल्या मुलाच्या मृत्यूचीच बातमी समजली. नुर मोहम्मद दारा हा लोणी काळभोरमधील महाविद्यालयात नोकरी करत बी. ए. च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो काम करुन शिकत होता. खरं तर त्याला इंजिनियर व्हायचं होतं, मात्र परिस्थितीमुळं त्याला ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही. मग त्याने आहे त्या परिस्थितीत काम करुन शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आजच्या अपघाताने मात्र त्याचं शिक्षणाचं स्वप्न देखील अधुरंच राहिलं.
कसा झाला अपघात?
लोणीकाळभोरजवळ पुणे सोलापूर महामार्गावर अर्टिगा आणि ट्रकमध्ये भीषण धडक होऊन मध्यरात्री एकच्या सुमारास हा थरारक अपघात झाला. वीकेंडनिमित्त सर्वजण पावसाळी पिकनिकसाठी रायगडला निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
अर्टिगा कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. कदम वाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी मोठी होती की कारमध्ये प्रवास करणाऱ्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी रायगडला फिरायला गेले होते.