अभिनेत्री श्रीदेवींची हत्या झाली, IPS अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाच्या दीड वर्षानेही तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरुच आहेत. केरळ जेलचे डीजीपी ऋषीराज सिंह यांनी श्रीदेवीच्या निधनाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
तिरुवनंतपुरम (केरळ) : अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाच्या दीड वर्षानेही तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरुच आहेत. केरळ जेलचे डीजीपी ऋषीराज सिंह यांनी श्रीदेवीच्या निधनाबाबत खळबळजनक दावा केला आहे. श्रीदेवीचा निधन हे सामान्य निधन नाही तर तो खून होता, असा दावा आयपीएस ऋषीराज सिंह यांनी केला आहे. ऋषीराज सिंह यांनी त्यांचे मित्र आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. उमादथन यांच्या माहितीवरुन हा दावा केला आहे. श्रीदेवी यांचं गेल्या वर्षी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई निधन झालं होतं. बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून श्रीदेवींच्या निधनाबाबत दबक्या आवाजात संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ऋषीराज सिंह यांनी केरळमधील एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात हा दावा केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला नसून त्यांचा खून करण्यात आला आहे”. या दाव्यासोबत त्यांचे मित्र फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि डॉ. उमादथनही सहमत आहेत.
“कुणी कितीही नशेत असो माणूस एक फूट पाण्यात बुडून मरु शकत नाही. जेव्हा माणसाचे पाय कुणी धरेल आणि डोकं पाण्यात बुडवेल तेव्हाच माणसाचा मृत्यू होऊ शकतो”, असं डॉक्टर उमादथन म्हणाले.
दरम्यान, ऋषीराज सिंह यांच्या या दाव्यानंतर श्रीदेवीचे पती बोनी कपूर चांगलेच संतापले. त्यांनी सिंह यांचा दावा खोडून काढला. “मी अशा मूर्खासारख्या कथांवर प्रतिक्रिया देणार नाही. अशा गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायला हवी असं मला अजिबात वाटत नाही. अशा बाबी या कोणाच्या तरी कल्पना असतील”, असं बोनी कपूर म्हणाले.
श्रीदेवीचं संपूर्ण कुटुंब दुबईतील एका लग्न सोहळ्याला गेलं होतं. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनच्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला. त्यावेळी त्या दारुच्या नशेत होत्या.