अभिनेता सोनू सूद साई दरबारी; फतेह चित्रपटातून मिळणारा नफा देणार अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमांना
अभिनेता सोनू सूद याने सहपरिवार शिर्डी येथे जाऊन साईदर्शन केलं आहे. सोनू याचा फतेह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटातून मिळणारा नफा अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमासाठी मदत देणार असल्याचंही सोनू सूदने सांगितलं.
अभिनेता सोनू सूद याने सहपरिवार शिर्डी येथे जाऊन साईचरणी माथा टेकवला आहे. सोनू याचा फतेह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाच्या यशासाठी सोनू सूद याने साईचरणी प्रार्थना केली आहे. फतेह चित्रपटातून मिळणारा नफा अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमासाठी मदत देणार असल्याचंही सोनू सूदने सांगितलं.
अभिनेता सोनू सूद साईदरबारी
अभिनेता सोनू सूद हा निस्सीम साईभक्त असून तो गेल्या 22 वर्षांपासून शिर्डीत साई दर्शनाला येत असतो. पण गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याने त्याला साईदरबारी यायला जमलं नसल्याचं त्याने म्हटलं. पण आता त्याने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी चित्रपटाच्या यशासाठी सोनू शिर्डीत साई दरबारी आला आहे.सोनू सूदने मध्यान्ह आरतीला हजेरी लावली.
तसेच चित्रपटाबाबत सोनूने अजून एक मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटातून जो काही नफा होईल तो गोरगरिबांना मदत करण्यासाठी वापरणार आहे, तसेच अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमांसाठीही मदत देणार असल्याचं त्याने सांगितले. यावेळी सोनूने म्हटलं की,”माझ्या करिअरची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने झाली होती.
चित्रपटातून मिळणारा नफा अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमांसाठी
त्यामुळे नेहमी साई दर्शनाला येतो. साईबाबांच्या आशिर्वादामुळेच मी इथे आहे. आज फतेह चित्रपटासाठी बाबांच्या चरणी प्रार्थना केली असून या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणारा नफा अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमांसाठी मदत देणार आहे”. असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित
फतेह हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी सोनू याने ‘फतेह’ नाव लिहिलेला काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला होता. अभिनेता सोनू सूद आगामी ‘फतेह’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची कथाही त्याने लिहिली आहे. त्यातही सोनू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान ‘फतेह’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून ‘अॅनिमल’ आणि ‘पुष्पा’तील अॅक्शनची आठवण झाल्या शिवाय राहात नाही. सामान्य माणसांची अश्रू पुसण्यासाठी नेहमी आघाडीवर राहणारा सोनू सूद पडद्यावरही सामान्य लोकांसाठी एक मोठी लढाई लढताना या सिनेमात दिसणार आहे.