MOVIE REVIEW MARDANI 2 : उत्कंठावर्धक ‘मर्दानी 2’
रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही लावला की बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांची बातमी वाचून, टीव्हीवर बघून मन सुन्न व्हायला होतं. तळपायाची आग मस्तकात जाते. इतकं क्रूर कोणी कसं वागू शकतं असे विचार मनात घोळत राहतात.
रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही लावला की बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांची बातमी वाचून, टीव्हीवर बघून मन सुन्न व्हायला होतं. तळपायाची आग मस्तकात जाते. इतकं क्रूर कोणी कसं वागू शकतं असे विचार मनात घोळत राहतात. हैद्राबादमध्ये घडलेली घटना याचं ताजं उदाहरण. बॉलिवूडमध्ये निर्माता-दिग्दर्शक नेहमीच वेगवेगळ्या पध्दतीनं हा ज्वलंत विषय मोठ्या पडद्यावर आणण्याचं धाडस करतात. आता पुन्हा एकदा दिग्दर्शक गोपी पुथरननं हा विषय हाताळला आहे. सोबतीला आहे बॉलिवूडची राणी अर्थात राणी मुखर्जी. आता राणी प्रमुख भूमिकेत, यशराज फिल्मसची निर्मिती त्यामुळे मेकर्सनं ‘मर्दानी’ (MOVIE REVIEW MARDANI 2) ही आपली हीट फ्रॅन्चाईसी या कथानकासाठी वापरण्याचं ठरवलं आणि ‘मर्दानी 2’ आकारास आला. 2014 मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या सिनेमात राणी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. शिवानी रॉयचं प्रमोशन होऊन आता ती एसपी शिवानी रॉय झाली आहे. ‘मर्दानी’च्या पहिल्या भागात ह्युमन ट्रॅफिकिंगचा गंभीर विषय हाताळला होता. आता या भागात शिवानी रॉयची लढत एका साईको किलरसोबत दाखवण्यात आली आहे. ही व्यक्ती मुलींचा रेप (MOVIE REVIEW MARDANI 2) करुन नंतर त्यांची निर्घृण हत्या करते. शिवानी या सगळ्या प्रकरणाचा छडा कसा लावते हीच या सिनेमाची कथा आहे.
राजस्थानमधील कोटामध्ये सिनेमाची कथा सुरु होते. एसपी शिवानी शिवाजी रॉय (राणी मुखर्जी) ची कोटामध्ये बदली झाली आहे. सिनेमाची पार्श्वभूमीही दसरा-दिवाळीची ठेवण्यात आली आहे. अचानक कोटामध्ये विचित्र घटना घडायला लागतात. एक सायको सिरियल किलर सनी (विशाल जेठवा) मुलींवर बलात्कार करुन त्यांची निर्घृण हत्या करतो. एवढचं काय तर सनी शहरात एका मिशनसाठी आलेला असतो. आता सनीचा विक्षिप्तपणा थांबवण्याचं आव्हान शिवानीसमोर उभं राहतं. डिपार्टमेन्टमधल्या अंतर्गत राजकारणाचा शिवानी बळी ठरते आणि तिच्या बदलीची ऑर्डर निघते. बरं या सगळ्या दरम्यान शहरात काही प्रतिथयश मंडळींच्या हत्याही होतात. त्यामुळे हा सगळा पेच कसा सोडवायचा हा यक्षप्रश्न पोलिस डिपार्टमेन्टसमोर उभा राहतो. दोन दिवसात शिवानीच्या जागेवर नवा अधिकारी या केसचा चार्ज घेणार असतो. त्यामुळे शिवानी ४८ तासात या केसचा निकाल लावायचा चंग बांधते. मग सुरु होतो शिवानी आणि सनीचा उत्कंठावर्धक, रोमांचक पाठलागाचा खेळ. आता सनी नेमका कोण असतो ? तो कोणत्या मिशनवर आलेला असतो ? त्याच्या मनात महिलांबद्दल चीड का असते ? मुलींची हत्या आणि इतर प्रतिथयश मंडळींची हत्या यांचं आपसात काही कनेक्शन असतं का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘मर्दानी 2’ बघावा लागेल.
पुरी पुथरन यांनीच सिनेमाची कथा लिहिली असून त्यांनीच सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. खरतर हा विषय 2.30 तासांपर्यंत सहज खेचता आला असता, मात्र दिग्दर्शकानं हा मोह टाळल्यामुळे सिनेमा अचूक परिणाम साधतो. एक तास चाळीस मिनिटांचा हा सिनेमा बघतांना बऱ्याच प्रसंगात तुम्ही सुन्न व्हाल. दिग्दर्शकानं सिनेमा गोळीबंद केल्यामुळे शेवटपर्यंत त्याची सिनेमावर पकड राहते. सिनेमात प्रत्येक गोष्टीवर बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते की पहिल्या ‘मर्दानी’ची सर या सिनेमाला नाही, पण तरीही हा सिनेमा शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. याचं सगळं श्रेय दिग्दर्शक गोपी यांना जातं. गोपीनं पहिला मर्दानी केवळ लिहीला होता. यंदा मात्र त्यांनी लिखाणासोबतच दिग्दर्शनातही हात आजमावत शिवानी रॉयला दमदार पध्दतीनं समोर आणलं आहे. ‘मर्दानी 2’ पहिल्या दृश्यापासूनच पकड घेतो. सिनेमात एकही गाणं नाही. मारधाड नाही. तरीही हा सिनेमा तुम्हाला गुंतवून ठेवतो. सिनेमात खलनायकाला जरा जास्तच हुशार दाखवण्यात आलं आहे. प्रत्येक वेळेस तो पोलिसांना तुरी देण्यात यशस्वी होतो. याबाबतीत दिग्दर्शकानं जरा जास्तच सिनेमॅटीक लिबर्टी घेतल्याचं जाणवतं. सिनेमाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे. हैद्राबाद आणि उन्नाव प्रकरणात नराधमांनी जी विकृती केली होती त्या जनावरी वृत्तीच्या लोकांना अशाच पध्दतीनं ठेचायला हवं ही भावना क्लायमॅक्स बघतांना तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
जिश्नू भट्टाचार्यच्या सिनेमॅटोग्राफीने एका पात्रासारखंच काम केलंय. पहिल्या दृश्यापासूनच तुम्ही त्या पात्राच्या प्रेमात पडता. मोनीषा बलदावाच्या एडिटींगनं सिनेमाला चार चॉंद लावले आहेत. जॉन स्टुअर्ट इदुरीचं बॅकग्राऊंड स्कोर प्रभावशाली आहे. राणीनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ती या सिनेमाचा युएसपी आहे. ‘मर्दानी’, ‘हिचकी’ आणि आता ‘मर्दानी २’. प्रत्येक सिनेमागणिक राणी चांगलीच प्रगल्भ होत आहे. राणीनं आपल्या पात्रावर पूर्णपणे कंट्रोल ठेवला आहे. अजिबात ‘मुंबईया’वाला अवतार राणीनं आपल्यावर हावी होऊ दिलेला नाही. अडंर वॉटर एक्शन सीन असो वा चेसिंग सीन सगळ्यातचं राणी अफलातून दिसली आहे. विशाल जेठवानं सायको किलरच्या भूमिकेत भन्नाट काम केलं आहे. विशालचा अभिनय बघतांना त्याचा हा पहिलाच सिनेमा असल्याचं अजिबात जाणवत नाही. सनीची क्रूरता, कठोरपणा, बेगडीपणा, महिलांप्रती त्याच्या मनात असलेली चीड हे सगळं विशालनं जबरदस्त वठवलंय. त्यामुळे या पात्राबद्दल प्रचंड चीड येते. राणीसोबत त्याची जुगलबंदी भन्नाट रंगली आहे. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
एकूणच काय तर बंदिस्त, वेगवान कथानक, कसलेलं दिग्दर्शन, राणीचा दमदार अभिनय यासाठी ‘मर्दानी 2’ एकदा बघायलाच हवा. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी 3.5 स्टार्स देत आहे.