मुंबई : बॉलिवूडमध्ये दिलकश अदा, टाइमलेस ब्यूटीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रेखा (Rekha birthday) यांचा आज 66 वा वाढदिवस आहे (Happy Birthday Rekha). रेखा यांचं वय 66 असलं तरीही सौंदर्याच्या बाबतीत त्या आजही टॉपच्या अभिनेत्रींना मागे सोडतात. त्यांचं सौंदर्य, त्यांचा अभिनय, त्यांच्यातली विनम्रता यामुळे त्या आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. रेखा यांच्या आयुष्यातही सिनेमांप्रमाणे अनेक ट्विस्ट्स अॅण्ड टर्न आलेत (Happy Birthday Rekha). आज आपण रेखा यांच्या आयुष्यातील असेच काही न ऐकलेले किस्से पाहाणार आहोत.
1. वडिलांचा तिरस्कार
रेखा यांनी लहान वयातच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. रेखा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला आहे. रेखा यांच्या आई तामिळ अभिनेत्री होत्या आणि त्यांचे वडील हे एक तामिळ सुपरस्टार होते. रेखा त्यांच्या वडिलांचा खूप राग करायच्या, कारण त्यांच्या वडिलांनी कधी त्यांच्या आईशी लग्न केले नव्हते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा यांचा जन्म त्यांच्या आईच्या लग्नापूर्वीच झाला होता. रेखा यांचे वडील त्यांना आपली मुलगी मानत नव्हते, त्यामुळे त्या आपल्या वडिलांचा राग करायच्या. इतकंच नाही, तर रेखा त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही गेल्या नाहीत.
2. 13 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण
रेखा जेव्हा 13 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना सिनेमांमध्ये काम करावं लागलं. रेखा यांना सिनेमांमध्ये यायचं नव्हतं, पण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्यामुळे त्यांना हे करावं लागलं. ‘अनजाना सफर’ हा रेखा यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमादरम्यान रेखा लैंगिक शोषणाला बळी पडल्या होत्या.
3. जेव्हा हिरोने 5 मिनिटांपर्यंत किस केलं
लेखक यासीर उस्मान यांनी त्यांच्या ‘रेखा : अॅन अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात रेखा यांच्या आयुष्यातील एक किस्सा लिहिला आहे. पुस्तकानुसार, ‘अनजाना सफर’ या सिनेमाचे दिग्दर्शक राजा आणि अभिनेता बिश्वजीत यांनी रेखाला त्रास देण्याचा प्लान बनवला.
या सिनेमाच्या शूट दरम्यान, जेव्हा रेखा सेटवर पोहोचल्या. रेखा सेटवर पोहोचताच दिग्दर्शकने अॅक्शन म्हटलं आणि बिश्वजीत यांनी रेखा यांना त्यांच्याकडे ओढलं आणि त्यांना किस करु लागले. रेखा यांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. रेखा यांना बिश्वजीत यांनी 5 मिनिटांपर्यंत किस केलं. बिश्वजीत रेखा यांना या पद्धतीने किस करत होते की रेखांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
रेखा यांना त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची तक्रार करायची होती, मात्र बदनामीच्या भीतीने त्या काहीही करु शकल्या नाही.
4. मार खाऊन सुपरस्टार झाली
रेखा यांच्या सौंदर्याचे जितके चाहते आहेत, तितकेच त्यांच्या अभिनयालाही लोकांनी डोक्यावर घेतलं. रेखा यांनी आतापर्यंत 150 पोक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. बीबीसीच्या एका मुलाखतीत रेखाने त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा किस्सा सांगितला होता.
रेखा एका रात्रीत स्टार बनल्या होत्या, पण त्यांना सुपरस्टार व्हायचं होतं. त्यासाठी त्यांच्या आईंनी त्यांची मदत केली. रेखा मार खाऊन स्टार बनल्या असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. त्यांची आई त्यांना जबरदस्ती नृत्य शिकण्यासाठी पाठवायच्या, असं रेखा यांनी या मुलाखतीत सांगितलं.
5. रेखा-अमिताभचं नातं
रेखा यांनी सिनेमांध्ये यशाची अनेक शिखरं गाठली. मात्र, व्यक्तीगत आयुष्यात त्यांना कुठलंही सुख मिळालं नाही. रेखा यांच्याबाबत नेहमी माध्यमांमध्ये चर्चेत असायच्या, त्यांचे अनेक अभिनेत्यांसोबत अफेअर आहेत अशा बातम्या नेहमीच माध्यमांमध्ये फिरत राहायच्या.
1973 मध्ये रेखाने अभिनेता विनोद मेहरा यांच्याशी लग्न केल्याची बातमी आली. मात्र, या सर्व निव्वळ अफवा असल्याचं खुद्द रेखा यांनी स्पष्ट केलं. विनोद मेहरा यांच्याव्यतिरिक्त रेखा यांचं नाव अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतही जोडण्यात आलं होतं. ‘सिलसिला’ सिनेमादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं समोर आलं होतं.
1990 मध्ये रेखाने दिल्लीचे व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या एका वर्षातच मुकेश यांनी आत्महत्या केली. त्यावेळी रेखा लंडनमध्ये होत्या.
6. मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो
नुकतंच काही दिवसांपूर्वी रेखा यांचा एक गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये रेखा ‘मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भी भुला न सकोगे’ हे गाणं गात होत्या. हा व्हिडीओ 1986 मधील एका मुलाखतीचा आहे.