आदित्य ठाकरे म्हणाले ममता बॅनर्जीं ‘सिंहिणी’… पंजाब, बंगाल नंतर महाराष्ट्रातही आघाडी धोक्यात?
अनेक दिवसांच्या अटकळीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली. बंगालमधून सुरू झालेली हे फुटीचे लोण आता इतर राज्यांमध्ये पसरताना दिसत आहे. बंगालनंतर महाराष्ट्रातही युती तुटणार का? असं प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई | 24 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काँगेसने प्रमुख विरोधी पक्षांची मोठ बांधली. इंडिया आघाडी असे या आघाडीला नाव देण्यात आले. मात्र, जागावाटपावरून इंडिया आघाडीची बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या धक्क्यातून सावरत नाही तोच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनीही माघार घेतली आहे. तर, महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांनीही मोठे विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी धोक्यात आल्याची शक्यता निर्माण झालीय.
तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला प्रस्ताव कॉंग्रेसने मान्य केला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेत कॉंग्रेसला हादरा दिला. त्यांनी लोकसभेच्या 42 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्या पाठोपाठ पंजाबमध्येही इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पंजाबमधील सर्व 13 लोकसभा जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार आहे अशी घोषणा केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार अशी अटकळ बांधण्यात येत होती. अखेर, त्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतून exit घेतली. बंगालमधून सुरू झालेली ही विरोधकांमधील फूट आता इतर राज्यांमध्ये पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रातही शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना सिंहिणी असे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी या सिंहिणीप्रमाणे लढत आहेत असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाब प्रमाणेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर विद्यमान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दावा सांगितला आहे. तर, काँग्रेसने ही जागा मागितली आहे. मात्र, या दावे प्रतिदावे यांची परिणीती माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन झाली.
मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून 2004 ते 2014 असे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. पण, नव्याने तयार झालेल्या समीकरणात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाणार असल्याने देवरा यांनी काँग्रेस सोडली. आता ते शिंदे गटाकडून ही जागा लढविण्याची तयारी करत आहेत.
दुसरीकडे कॉंग्रेस नेते संजय निरुपम आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यातही तू तू मै मै सुरु आहे. उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर संजय निरुपम यांनी दावा सांगितला आहे. तसेच, प्रादेशिक पक्ष आता काँग्रेसला सल्ला देत आहेत, असा टोलाही लगावला होता. मी कधीच महामंडळाची निवडणूकही लढवली नाही. ते उद्दामपणे बोलत आहेत. हे इंडिया आघाडीच्या आरोग्यासाठी चांगले नाही अशी त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती.
दुसरीकडे महाराष्ट्रातही कॉंग्रेसने सर्वाधिक जागा आपल्यालाच मिळाव्यात असा सूर धरला आहे. कॉंगेस नेत्यांचा हा सूर पाहता असे स्पष्टपणे सूचित होते की, महाराष्ट्रात इंडिया आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही. हे सर्व प्रकरण जागावाटपावर अडकले आहे. आणखी काही दिवस सर्व काही असेच सुरू राहिले तर मात्र राज्यातही इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.