शरद पोंक्षेंचं दमदार पुनरागमन, ‘अग्निहोत्र 2’चा मुहूर्त ठरला
‘अग्निहोत्र 2’ मध्ये नव्या पिढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडेल. या सप्तमातृकांच्या रुपात दिसतील सात अभिनेत्री. या सात अभिनेत्रींपैकी एक असेल अक्षरा म्हणजेच रश्मी अनपट.
मुंबई : कर्करोगावर मात करत रंगभूमीवर पुनरागमन केलेले दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे लवकरच छोट्या पडद्यावरही दिसणार आहेत. स्टार प्रवाहवर 2 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता ‘अग्निहोत्र 2’ पाहायला मिळणार आहे. ‘अग्निहोत्र 2’चा प्रोमो स्टार प्रवाहवर लाँच करण्यात आला. यामध्ये शरद पोंक्षे यांच्यासोबत अभिनेत्री रश्मी अनपट पाहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षांनंतर रश्मी ‘अग्निहोत्र 2’ मधून (Agnihotra 2 on Star Pravah) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती अक्षरा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
अक्षरा ही अतिशय शांत, साधी, सरळ आणि आपल्या तत्वांशी ठाम असणारी मुलगी आहे. अक्षराच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडली आहे, ज्याचा संबंध वाड्याशी आहे. अक्षराला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ती अग्निहोत्री वाड्यात येणार आहे. ही गोष्ट नव्या पिढीची असल्यामुळे पहिलं पर्व जरी प्रेक्षकांनी पाहिलेलं नसलं तरी हरकत नाही.
अग्निहोत्र मालिकेविषयी आणि मालिकेतल्या पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये अद्यापही जिव्हाळा आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. ‘अग्निहोत्र 2’ मध्ये नव्या पिढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडेल. या सप्तमातृकांच्या रुपात दिसतील सात अभिनेत्री. या सात अभिनेत्रींपैकी एक असेल अक्षरा म्हणजेच रश्मी अनपट.
पहिल्या पर्वात महादेव अग्निहोत्रींची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारली होती. आजारावर मात करत ‘अग्निहोत्र 2’ मध्येही शरद पोंक्षे त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहेत. अग्निहोत्र 1 चे दिग्दर्शन अभिनेते-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले होते. पहिल्या भागात विक्रम गोखले, शरद पोंक्षे, डॉ. मोहन आगाशे, दिवंगत विनय आपटे, गिरीश ओक, मोहन जोशी, सुहास जोशी, इला भाटे, शुभांगी गोखले, मानसी मागीकर अशी तगडी स्टारकास्ट होती. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनी या मालिकेतून पदार्पण केलं होतं.
राष्ट्रपती राजवटीचा फटका नाट्यसंमेलनाला नाही
योगायोगाने सतीश राजवाडे स्टार प्रवाह वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख म्हणून सध्या जबाबदारी सांभाळत आहेत. ‘अग्निहोत्र 2’ची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन (Agnihotra 2 on Star Pravah) करणार आहेत.