स्वस्तात सोने विक्रीचं आमिष देऊन लुटणं जीवावर बेतलं, अहमदनगरमधील 4 जणांच्या हत्येचा उलगडा
अहमदनगरमध्ये स्वस्तात सोने खरेदी-विक्रीच्या प्रकरणात थेट 4 जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे (Shrigonda Ahmednagar 4 murder mystery case Solved).
अहमदनगर : अनेकदा स्वस्तात सोने खरेदीच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर येतात. मात्र, अहमदनगरमध्ये स्वस्तात सोने खरेदी-विक्रीच्या प्रकरणात थेट 4 जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे (Shrigonda Ahmednagar 4 murder mystery case Solved). सुरुवातील जुन्या वादातून हत्या झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, अहमदनगर पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या 5 दिवसांमध्ये या प्रकरणाचा उलगडा केला. तसेच सर्व 5 आरोपींना गजाआड केलं आहे. या सर्वांना जळगावमध्ये जाऊन अटक करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ 4 जणांची हत्या झाल्याची घटना 20 ऑगस्ट रोजी घडली. सुरुवातीला तक्रारदारांनी ही हत्या जुन्या वादातून झालेल्या मारामारीत झाल्याचं सांगितलं. मात्र, अहमदनगर पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कसून तपासात अनेक नव्या गोष्टी समोर आल्या. यानंतर गुप्त माहिती मिळवत पोलिसांनी या प्रकरणाची अधिक माहिती घेतली तेव्हा या हत्येमागील कारणांचा उलगडा झाला आहे.
हत्या झालेल्यांसह त्यांच्या साथीदारांनी जळगावमधील आरोपींना स्वस्तात सोने देण्याचं आमिष दाखवून अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यात विसापूर फाट्याजवळ बोलावले होते. त्याआधी मृतांसह त्यांच्या साथीदारांनी जळगावमधील आरोपींना पहिल्या भेटीत खरं सोनं देऊन विश्वास आत्मसात केला. त्यानंतर 4 लाख रुपयांमध्ये 250 ग्रॅम सोने देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. हे सोनं घेण्यासाठी सोने विक्री करणाऱ्यांनी आरोपींना विसापूर फाटा येथे बोलावलं. तेथे त्यांच्याकडून रोख 2 लाख 95 हजार रुपये मोजून घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यातील एका महिलेच्या अंगावरील सोने ओरबाडून त्यांना मारहाण करण्यात आली. यातच आरोपींनी लुटमार करणाऱ्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यात चौघांचा मृत्यू झाला.
आता दोन्ही बाजूने पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्वस्तात सोने विक्री करण्याच्या नावाने फसवणूक, लूटमार आणि हल्ल्याच्या गुन्ह्यासह चार जणांची हत्या अशा दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांच्या साथीदारांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्यावर आरोपींनी रोख रक्कम, सोन्याचे दागिणे अशा 3 लाख 15 हजार रुपयांच्या दरोड्याची तक्रा दिली आहे.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा आणि बेळवंडी पोलिसांनी तपास करुन या हत्येचा उलगडा केलाय. हत्या होणाऱ्यांमध्ये लिंबा काळे, नातिक चव्हाण, नागेश चव्हाण आणि श्रीधर चव्हाण यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरुन आरोपींचा माग काढला. यात जळगाव येथील आरोपी नरेश सोनवणे, कल्पना सपकाळे, आशा सोनवणे आणि प्रेमराज पाटील यांच्यासह कार चालक योगेश ठाकूर यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या सर्वांना पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता आरोपींनी स्वस्तात सोने खरेदीच्या प्रकारातून हत्या केल्याची कबुली दिली.
संबंधित बातम्या :
रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी 26 वर्षांनी मिळाली, मुंबई सेंट्रल पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या
वर्ध्यात क्षुल्लक कारणावरुन वाद, मित्राला विहिरीत ढकलून खून
Shrigonda Ahmednagar 4 murder mystery case Solved