अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, गोपीनाथ मुंडेंवरही लाठी हल्ला : संजय काकडे
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे.
![अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, गोपीनाथ मुंडेंवरही लाठी हल्ला : संजय काकडे अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, गोपीनाथ मुंडेंवरही लाठी हल्ला : संजय काकडे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2019/07/15142023/Ajit-Pawar-Sanjay-Kakade.jpg?w=1280)
पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. यापूर्वी अजित पवार यांनी भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना काकडे पुण्यात बोलत होते.
संजय काकडे यांनी अजित पवारांना आपल्या भूतकाळात डोकावण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “अजित पवारांनी सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर केला. त्यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर सत्तेत असताना आंदोलनादरम्यान लाठी हल्ला केला. मावळमध्येही त्यांनीच शेतकऱ्यांवर गोळीबार केला.”
‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक घरं फोडली आहेत’
काकडे यांनी यावेळी भाजपने मात्र सत्तेचा कोणताही दुरुपयोग केला नसल्याचा दावा केला. तसेच भाजपने कुणावरही कोणताही हल्ला केला नसल्याचे सांगितले. काकडे पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक घरं फोडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर पक्षातील नेत्यांना आयात करुनच वाढला आहे.”
लवकरच भाजपचे अधिकृत सदस्य होणार असल्याची काकडेंची घोषणा
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पराभूत होतील असं भाकित संजय काकडे यांनी वर्तवलं होतं. त्यामुळे दानवे काकडेंवर चांगलेच नाराज झाले होते. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी संजय काकडेंवर बोचरी टीका केली होती. संजय काकडे हे पक्षाचे सदस्य नसल्याने काहीही बोलू शकतात. ते कोणताही सर्वे करु शकतात, असं मत रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलं होतं. त्यावर संजय काकडे यांनी आपण लवकरच भाजपचे अधिकृत सदस्य होऊ असं म्हटलं आहे. काकडे म्हणाले, “भाजप देईन ती जबाबदारी स्वीकारेन. मी सहयोगी सदस्य आहे. मात्र, आता लवकरच मी भाजपचा सदस्य होईन.”