Rohit Pawar | चौकशीला जाताना कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाण्याची गरज काय ? उमेश पाटील यांची रोहित पवारांवर टीका
राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान अजित पवार गटाने त्यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार या प्रकरणाचाही पॉलिटिकल इव्हेंट करू पहात आहेत. जर चौकशीसाठी जायचचं आहे तर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज काय ? असा सवाल उमेश पाटील यांनी विचारला.
मुंबई | 24 जानेवारी 2024 : मुंबईत आज हायव्होल्टेज ड्रामा रंगण्याची चिन्हं आहेत. आज, राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून थोड्याच वेळात त्यांची चौकशी सुरू होईल. या पार्श्वभूमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि हजारो कार्यकर्ते रोहित पवारांच्या पाठिशी आहेत. बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयात जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे असतील. रोहित पवारांच्या सकाळी नऊच्या सुमारास हॉटेल ट्रायडेंट मधून पार्टी कार्यालयात जाणार आहेत. कार्यकर्ते व शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार आहेत.
रोहित पवार 11 च्या सुमारास ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. त्याआधी ते हॉटेल ट्रायडेंट मधून पार्टी कार्यालयात जाणार आहेत. कार्यकर्ते व शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार आहेत. रोहित पवार यांच्या समर्थनासाठी कर्जत जांबखेड मतदार संघातून अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते राष्ट्रवादी भवना समोर जमले आहेत.
अजित पवार गटाची टीका
दरम्यान रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाकडून टीका करण्यात आली आहे. ‘ रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करत आहेत ‘ अशी टीका अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीला बोलावलं आहे. ते या चौकशीचा सुद्धा राजकीय इव्हेंट करू पहात आहेत. एका बाजूला ते म्हणतात की माझ्यावर ही चौकशी लावण्यामागे कोणाचातरी हात आहे. केंद्रीय यंत्रणांवर कोणाचा तरी दबाव आहे असं त्यांना सूचित करायचं आहे.
जर चौकशीसाठी जायचचं आहे तर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज काय ? असा सवाल उमेश पाटील यांनी विचारला आहे. रोहित पवार या प्रकरणाचाही पॉलिटिकल इव्हेंट करू पहात आहेत. असा इव्हेंट करून कोणावर तरी खापर फोडायची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
काय आहे प्रकरण
कन्नड सहकारी कारखाना अवसायनात निघाला. शिखर बँकेने त्याची लिलाव प्रक्रिया सुरु केली. हा कारखाना बारामती ॲग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. बारामती ॲग्रोशिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक पाच कोटी रुपये जमा केले ते, बारामती ॲग्रोने दिल्याचा आरोप आहे.